India vs Afghanistan : अफगाणिस्तानविरुद्धच्या आगामी 3 सामन्यांच्या वनडे सीरिजसाठी भारतीय टीमची घोषणा करण्यात आली आहे. या सीरिजसाठी टीममध्ये अनेक मोठे बदल पाहायला मिळत आहेत. रोहित शर्मा आणि हार्दिक पांड्या या स्टार खेळाडूचा टीममध्ये समावेश करण्यात आला आहे. पण, त्यांच्या खेळण्याबाबत एक मोठी अट ठेवण्यात आली आहे. निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर यांनी स्पष्ट केलंय की, या दोघांची उपलब्धता ही त्यांच्या फिटनेस टेस्टवर अवलंबून असेल. या सीरिजसाठी भारतीय टीमचं नेतृत्त्व शुबमन गिलकडे सोपवण्यात आलंय. तर श्रेयस अय्यर व्हाईस कॅप्टन असेल.
नव्या चेहऱ्यांचा समावेश
अफगाणिस्तानविरुद्धच्या वन-डे सीरिजसाठी विराट कोहलीचा टीममध्ये समावेश करण्यात आला आहे. विकेटकीपिंगसाठी केएल राहुल आणि इशान किशन हे दोन पर्याय टीमकडे असतील. या स्क्वॉडमध्ये निवड समितीने काही नव्या चेहऱ्यांनाही संधी दिली आहे. यामध्ये गुरनूर ब्रार, प्रिन्स यादव आणि हर्ष दुबे या खेळाडूंचा समावेश 15 जणांच्या टीममध्ये करण्यात आला आहे. अनुभवी फास्ट बॉलर जसप्रीत बुमराहला या सीरिजसाठी विश्रांती देण्यात आली आहे.
शुबमन गिलकडे टेस्ट टीमचंही नेतृत्व
अफगाणिस्तानविरुद्ध होणाऱ्या एकमेव टेस्ट मॅचसाठी देखील टीम जाहीर करण्यात आली असून तिथेही शुबमन गिलच कॅप्टन्सी करेल. ऋषभ पंतच्या जागी केएल राहुलची टेस्ट टीमचा व्हाईस कॅप्टन म्हणून निवड करण्यात आलीय. सिनियर ऑल राऊंडर रवींद्र जडेजाला या टेस्ट मॅचमधून विश्रांती देण्यात आली आहे. या टेस्ट टीममध्ये मानव सुथार आणि गुरनूर ब्रार या आयपीएलमधील गुजरात टायटन्सच्या खेळाडूंना पहिल्यांदाच संधी मिळाली आहे.
( नक्की वाचा : Virat Kohli : 'त्या' जागी मी एक सेकंदही थांबणार नाही; 2027 वर्ल्ड कपच्या आधीच विराट कोहलीचा स्पष्ट मेसेज )
असं आहे वेळापत्रक
अजित आगरकर यांच्या नेतृत्वाखालील निवड समितीने अफगाणिस्तानच्या भारत दौऱ्यासाठी हे संघ निश्चित केले आहेत. या दौऱ्याची सुरुवात 6 जूनपासून मुल्लानपूर येथे होणाऱ्या एकमेव टेस्ट मॅचने होईल. त्यानंतर 14 जूनपासून धरमशाला, लखनौ आणि चेन्नई येथे 3 वनडे मॅचेस खेळवल्या जाणार आहेत.
वनडे सीरिजसाठी भारतीय टीम: शुबमन गिल (कॅप्टन), रोहित शर्मा, विराट कोहली, श्रेयस अय्यर (उपकर्णधार), केएल राहुल (विकेटकीपर), इशान किशन (विकेटकीपर), हार्दिक पांड्या, नितीश कुमार रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर, प्रिन्स यादव, अर्शदीप सिंग, प्रसिद्ध कृष्णा, कुलदीप यादव, गुरनूर ब्रार, हर्ष दुबे.
टेस्ट मॅचसाठी भारतीय टीम: शुबमन गिल (कॅप्टन), यशस्वी जयस्वाल, केएल राहुल (उपकर्णधार), साई सुदर्शन, ऋषभ पंत, देवदत्त पडिक्कल, नितीश कुमार रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा, मानव सुथार, गुरनूर ब्रार, हर्ष दुबे, ध्रुव जुरेल.