आयपीएलच्या सतराव्या हंगामात मुंबई इंडियन्स संघाने पहिल्या विजयाची चव चाखली आहे. सलामीचे तिन्ही सामने गमावून हॅटट्रीक साजरी केलेल्या मुंबई इंडियन्सने घरच्या मैदानावर खेळत असताना दिल्ली कॅपिटल्सवर 29 धावांनी मात केली. फलंदाजांचं वर्चस्व राहिलेल्या या सामन्यात मुंबईकडून रोमारियो शेफर्ड तर दिल्लीकडून ट्रिस्टन स्टूब्ज आणि पृथ्वी शॉ यांनी आपली छाप पाडली. स्पर्धेत आपलं आव्हान टिकवून ठेवण्यासाठी मुंबईला या सामन्यात विजय मिळवणं आवश्यक होतं.
पहिल्यांदा फलंदाजी करताना मुंबईची धडाकेबाज सुरुवात -
टॉस जिंकून दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार ऋषभ पंतने पहिल्यांदा बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला. परंतु त्याचा हा निर्णय चांगलाच फसला. रोहित शर्माने इशान किशनच्या साथीने मुंबई इंडियन्सला चांगली सुरुवात केली. पॉवरप्लेच्या षटकांमध्ये दिल्लीच्या गोलंदाजांचा यथेच्छ समाचार घेत रोहितने चौफेर फटकेबाजी केली. इशान किशननेही त्याला दुसऱ्या बाजूने मोलाची साथ दिली. पहिल्या विकेटसाठी दोघांनीही 80 धावांची भागीदारी केली.
अवश्य वाचा - हार्दिक पांड्याच्या बचावासाठी धावला 'दादा', म्हणाला त्याला ट्रोलिंग करणं चुकीचं...
फटकेबाजी करत असलेला रोहित शर्मा आज शतक पूर्ण करणार असं वाटत होतं. परंतु अक्षर पटलेच्या बॉलिंगवर खेळताना रोहित शर्मा चाचपडताना दिसला. अखेरीस 49 धावांवर अक्षरने रोहितची दांडी गुल करत त्याला माघारी धाडलं. रोहितच्या 49 धावांमध्ये 6 फोर आणि 2 सिक्स होते.
चांगल्या सुरुवातीनंतर मुंबईची गाडी रुळावरुन घसरली -
यानंतर दिल्लीच्या बॉलर्सनी प्रभावी मारा करत मुंबईच्या धावगतीवर अंकुश आणला. दुखापतीमधून पुनरागमन करणाऱ्या सूर्यकुमार यादवला नॉर्कियाने बाद केलं. सूर्यकुमार आपलं खातंही उघडू शकला नाही. यानंतर इशान किशनने सामन्याची सूत्र आपल्या हाती घेत तिलक वर्माच्या साथीने डाव सावरण्याचा प्रयत्न केला. परंतु काही फटके खेळून तो बाद झाला. अक्षर पटेलनेच त्याची विकेट घेतली. इशान किशनने 23 बॉलमध्ये 4 फोर आणि 2 सिक्स लगावत 42 धावा केल्या. या धक्क्यातून मुंबईचा संघ सावरतो न सावरतो तोच तिलक वर्माही माघारी परतला.
शेपर्डचा रुद्रावतार, सामन्याचं पारडं मुंबईच्या बाजूने -
यानंतर कर्णधार हार्दिक पांड्या आणि टीम डेव्हीड जोडीने मुंबईचा डाव सावरला. दोघांनीही पाचव्या विकेटसाठी 60 धावांची भागीदारी केली. यात हार्दिकने संयमी तर डेव्हीडने आक्रमक फटके खेळले. अखेरीस नॉर्कियाने हार्दिकला बाद करत मुंबईला पाचवा धक्का दिला. परंतु यानंतर मैदानात आलेल्या रोमारिया शेपर्डने सामन्याचं चित्रच पालटलं. वानखेडे मैदानावर चौकार-षटकारांची आतिषबाजी करत शेपर्डने मुंबईला द्विशतकी धावसंख्येचा टप्पा ओलांडून दिला. अखेरीस निर्धारित षटकांमध्ये मुंबईने 5 विकेट गमावत 234 धावांपर्यंत मजल मारली. शेपर्डने 10 बॉलमध्ये 3 फोर आणि 4 सिक्स लगावत नाबाद 39 धावा केल्या. त्याला टीम डेव्हीडनेही 21 बॉलमध्ये 2 फोर आणि 4 सिक्स लगावत नाबाद 45 धावा करत उत्तम साथ दिली. दिल्लीकडून अक्षर पटेल आणि नॉर्कियाने प्रत्येकी २-२ तर खलिल अहमदने १ विकेट घेतली.
पृथ्वी शॉ ने दाखवली दिल्लीला आशा -
डोंगराएवढ्या धावसंख्येचा पाठलाग करत असताना दिल्ली कॅपिटल्सने डेव्डीड वॉर्नरला लवकर गमावलं. शेपर्डच्या बॉलिंगवर मोठा फटका खेळण्याच्या नादात तो बाद झाला. परंतु यानंतर पृथ्वी शॉ ने अभिषेक पोरेलला साथीला घेत उत्तम खेळी केली. वानखेडे मैदानावर खेळण्याचा अनुभव गाठीशी असलेल्या पृथ्वी शॉ ने मुंबईच्या बॉलर्सला यथेच्छ तुडवलं. अभिषेक पोरेलच्या साथीने पृथ्वी शॉ ने दुसऱ्या विकेटसाठी 88 धावांची भागीदारी केली. या भागीदारीत पृथ्वीने आपलं अर्धशतकही पूर्ण केलं. ही जोडी मुंबईसाठी डोकेदुखी ठरत असतानाच बुमराहने शॉ ला माघारी धाडलं. त्याने 40 बॉलमध्ये 8 फोर आणि 3 सिक्स लगावत 66 धावा केल्या.
ट्रिस्टन स्टब्सची एकाकी झुंज, दिल्लीच्या इतर फलंदाजांची निराशा -
यानंतर दिल्लीला विजयासाठी आवश्यक धावांचं समीकरण कठीण होऊन बसलं. तरीही हार न मानता ट्रिस्टन स्टब्सने तुफान फटकेबाजी करत दिल्लीला विजयाच्या आशा दाखवल्या. परंतु दुसऱ्या बाजूने अभिषेक पोरेल, ऋषभ पंत, अक्षर पटेल हे महत्वाचे फलंदाज मोक्याच्या क्षणी बाद झाले. स्टब्सने 25 बॉलमध्ये 3 फोर आणि 7 सिक्स लगावत नाबाद 71 धावा केल्या. परंतु त्याला मधल्या फळीत इतरांची साथ मिळाली नाही. ज्यामुळे निर्धारित षटकांत दिल्लीचा संघ ८ विकेट गमावत २०५ धावांपर्यंतच मजल मारु शकला. मुंबईकडून जेराल्ड कोएत्झीने ४ विकेट घेतल्या. त्याला बुमराहने २ तर शेपर्डने १ विकेट घेत चांगली साथ दिली.