IPL 2025 New Schedule : भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणावामुळे आयपीएल 2025 चा सिझन काही दिवस स्थगित करण्यात आला होता. आता हा सिझन पुन्हा सुरु झाला आहे. त्यापूर्वी साहजिकच वेळापत्रकामध्ये बदल करावा लागला. आता त्यानंतर आणखी एकदा आयपीएलचं वेळापत्रक बदलण्यात आलं आहे. पावसाची शक्यता आणि हवामानाचा विचार करता हा बदल करण्यात आलाय. नव्या वेळापत्रकामध्ये RCB फॅन्सना धक्का बसला आहे. तसंच फायनलची जागही बदलली आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
काय आहे नवं वेळापत्रक?
आयपीएलच्या नविया वेळापत्रकानुसार आता अहमदाबादमध्ये फायनल होणार आहे. यापूर्वी कोलकातामध्ये आयपीएल फायनल होणार होती. अहमदाबादमध्ये 3 जून रोजी आयपीएल फायनल खेळवली जाईल. त्याचबरोबर क्वालिफायर 2 चा सामनाही तिथंच खेळवला जाणार आहे. तर पहिले दोन प्ले ऑफ चे सामने मोहालीजवळच्या मुल्लानपूरमध्ये होणार आहेत, अशी घोषणा बीसीसीआयनं केली आहे.
बीसीसीआयने 23 मे रोजी रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात बंगळूरु येथे होणारा सामना लखनऊला हलवला आहे. चिन्नास्वामी स्टेडियममधील यापूर्वीचा सामना देखील पावसामुळे रद्द झाला होता.
बीसीसीआयने ठिकाणांबाबत निर्णय घेताना पावसाळ्याचाही विचार केला आहे. "आयपीएल गव्हर्निंग कौन्सिलने हवामानाची परिस्थिती आणि इतर निकषांचा विचार करून प्लेऑफसाठी नवीन ठिकाणे निश्चित केली आहेत," असे बीसीसीआयने एका निवेदनात म्हटले आहे.
एक तासाचा अतिरिक्त प्रतीक्षा कालावधी
बीसीसीआयनं प्रसिद्ध केलेल्या निवेदनानुसार 'प्लेऑफच्या टप्प्याप्रमाणेच, मंगळवार, 20 मे पासून सुरू होणाऱ्या लीग टप्प्यातील उर्वरित सामन्यांसाठी खेळण्याच्या परिस्थितीनुसार एक तासाचा अतिरिक्त प्रतीक्षा कालावधी दिला जाईल." यापूर्वी हा कालावधी फक्त एक तास होता, पण आता तो दोन तासांचा असेल. क्वालिफायर 1 आणि एलिमिनेटर 29 आणि 30 मे रोजी मुल्लानपूर येथे होतील, तर अहमदाबादमध्ये 1 आणि 3 जून रोजी क्वालिफायर 2 आणि फायनल होईल.
जगातील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम असलेल्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये आयपीएल फायनल होण्याची ही तिसरी वेळ असेल. या मैदानावर यापूर्वी 2022 आणि 2023 मध्ये फायनल झाली होती.