Mumbai Indians, IPL 2025 : मुंबई इंडियन्सचा पुढील आयपीएल सिझनमध्ये कॅप्टन कोण असेल हा प्रश्न फॅन्सना गेल्या अनेक महिन्यांपासून सतावत आहे. मुंबईनं पुढील आयपीएल सिझनसाठी पाच खेळाडूंना रिटेन केलं आहे. त्यामध्ये जसप्रीत बुमराह (18 कोटी), रोहित शर्मा (16.30 कोटी), सू्र्यकुमार यादव (16.35 कोटी ) हार्दिक पांड्या (16.35 कोटी) आणि तिलक वर्मा (8 कोटी) यांचा समावेश आहे. या निर्णयामुळे मुंबई इंडियन्सकडं आगामी आयपीएल सिझनसाठी पाच भारतीय खेळाडू कायम असतील.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
कोण असेल कॅप्टन?
मुंबई इंडियन्ससाठी मागील आयपीएल सिझन अगदीच नाट्यमय ठरला. गुजरात टायटन्समधून हार्दिक पांड्याला टीमनं खरेदी करुन थेट कॅप्टन केलं. मुंबईच्या फॅन्सना हा निर्णय आवडला नाही. त्यांनी त्याचा जोरदार विरोध केला. हार्दिकच्या कॅप्टनसीमध्ये टीम शेवटच्या नंबरवर फेकली गेली. त्यातच आगामी सिझनसाठी निवडण्यात आलेल्या पाच पैकी चार खेळाडूंनी (रोहित, हार्दिक, सूर्या आणि बुमराह) टीम इंडियाची कॅप्टनसी केली आहे. त्यामुळे आगामी सिझनसाठी मुंबई इंडियन्सचा कॅप्टन कोण? हा प्रश्न विचारण्यात येत होता.
मुंबई इंडियन्सनं खेळाडू रिटेन केल्यानंतर लगेच पुढील सिझनचा कॅप्टनही जाहीर केला आहे. पाच वेळा आयपीएल विजेती मुंबईची टीम आगामी सिझनमध्ये हार्दिक पांड्याच्या कॅप्टनसीमध्ये खेळणार आहे.
रोहित आणि हार्दिक काय म्हणाले?
मुंबई इंडियन्सचा माजी कॅप्टन रोहित शर्मानं मुंबई इंडियन्सनं रिटेन केल्यानंतर त्याच्या भावना व्यक्त केल्या आहेत. रोहित शर्मा सलग पंधरावा सिझन मुंबई इंडियन्सकडून खेळणार आहे. आगामी सिझनबद्दल बोलताना तो म्हणाला, 'मी मुंबई इंडियन्सचा पुन्हा सदस्य झाल्याबद्दल उत्साहीत आहे. मी इथं खूप क्रिकेट खेळलो आहे. मी माझ्या क्रिकेट कारकिर्दीला इथूनच सुरुवात केली. त्यामुळे हे शहर माझ्यासाठी अत्यंत, अत्यंत विशेष आहे. मी इथं आनंदी आहे.'
टीम इंडियाकडून खेळलेल्या पाच खेळाडूंना रिटेन करण्याच्या मुंबई इंडियन्सच्या निर्णयाचंही रोहितनं स्वागत केलं. 'राष्ट्रीय टीमचं सर्वोच्च पातळीवर प्रतिनिधित्व करणाऱ्या खेळाडूंना प्राधान्य देण्यात आलं पाहिजे. त्यामुळे मी या निर्णयाबद्दल अतिशय आनंदी आहे,' असं रोहितनं स्पष्ट केलं.
हार्दिक पांड्यानंही त्याला रिटेन केल्याबद्दल मुंबई इंडियन्सचे आभार मानले आहेत. 'मला इथं भरपूर प्रेम मिळालं आहे. माझा प्रवास इथूनच सुरु झाला. मी आयुष्यात जे काही मिळवलं आहे, त्यामध्ये मुंबई इंडियन्सचं मोठं योगदान आहे,' असं हार्दिक म्हणाला. 'आम्ही पाच खेळाडू म्हणजे हाताची पाच बोटं असलो तरी एकत्र एक मूठ आहोत,' असं हार्दिकनं सांगितलं.