IPL 2026 Auction : मैदानावर सातत्यानं रन्स केले. स्वतःचं वजन कमी करुन फिटनेसही पहिल्यापेक्षा चांगला केला. पण, तरीही नशिबाने पुन्हा एकदा सरफराज खानकडं पाठ फिरवली आहे. ऑस्ट्रेलियाचा ऑलराऊंडर कॅमरून ग्रीनवर कोट्यवधींची उधळण झाली. पण, त्याचवेळी मुंबईच्या या गुणवाण बॅटरला कुणीही खरेदी केलं नाही. अबू धाबी येथील एतिहाद एरिनामध्ये सुरू असलेल्या आयपीएल 2026 च्या मिनी ऑक्शनमध्ये पहिल्या राऊंडमध्ये सरफराज अनसोल्ड ठरला.
आयपीएलच्या या लिलावात कॅमरून ग्रीनवर कोलकाता नाईट रायडर्सने 25.20 कोटी रुपयांची विक्रमी बोली लावली. दुसरीकडे, सरफराज खानचे नाव जेव्हा लिलावासाठी पुकारण्यात आले, तेव्हा एकाही संघाने त्याच्यावर रस दाखवला नाही. विशेष म्हणजे सरफराजची बेस प्राईस केवळ 75 लाख रुपये इतकी कमी होती. तरीही एकाही फ्रँचायझीने त्याच्यासाठी बोली लावली नाही. पण नंतरच्या टप्प्यात त्याचं नशिब पालटलं. पाच वेळा ही स्पर्धा जिंकणाऱ्या चेन्नई सुपर किंग्सनं त्याला 75 लाखांमध्ये खरेदी केलं.
सरफराज सर्वोत्तम फॉर्ममध्ये
सरफराज खानच्या बाबतीत ही दुर्दैवी घटना अशा वेळी घडली आहे, जेव्हा तो आपल्या कारकिर्दीतील सर्वोत्तम फॉर्ममध्ये आहे. काही काळापूर्वीपर्यंत तो टीम इंडियाच्या टेस्ट टीमचा भाग होता. 2024-25 च्या बॉर्डर गावस्कर ट्रॉफीसाठी तो ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरही गेला होता. मात्र, त्या दौऱ्यानंतर अचानक त्याला संघातून वगळण्यात आले. टीम इंडियातून बाहेर पडल्यानंतर त्याने आपल्या फिटनेसवर प्रचंड मेहनत घेतली, मात्र तरीही राष्ट्रीय निवड समितीचं लक्ष वेधण्यात त्याला अपयश आलं.
( नक्की वाचा : IPL Auction 2026 Live: कोणत्या टीमनं खरेदी केला कोणता खेळाडू? वाचा लिलावातील सर्व अपडेट )
सरफराजच्या फिटनेसवर नेहमीच टीका केली जात होती. वाढलेले वजन आणि मैदानावरील चपळता यावरून त्याला अनेकदा लक्ष्य करण्यात आले. ही टीका गांभीर्याने घेत 28 वर्षीय सरफराजने गेल्या काही महिन्यांत स्वतःमध्ये कमालीचा बदल घडवून आणला. त्याने जिममध्ये घाम गाळून आणि कडक डाएट फॉलो करून तब्बल 10 किलो वजन कमी केले. या ट्रान्सफॉर्मेशननंतर तो अधिक फिट दिसत आहे, तरीही भारतीय संघात पुनरागमन करण्याचे त्याचे स्वप्न सध्या तरी अधुरेच राहिले आहे.
सरफराज खानची आकडेवारी पाहिली तर तो किती मोठा मॅच विनर आहे हे स्पष्ट होते. त्याने टीम इंडियासाठी आतापर्यंत 6 टेस्ट खेळले असून 1 सेंच्युरी आणि 3 हाफ सेंच्युरीच्या मदतीने 371 रन्स केले आहेत. आयपीएलचा विचार केला तर त्याने 50 सामन्यांत 585 रन्स केले आहेत.
सध्या सुरू असलेल्या सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये तर त्याने अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. आजच म्हणजेच 16 डिसेंबर रोजी राजस्थानविरुद्ध खेळताना त्याने अवघ्या 22 बॉलमध्ये 73 रन्सची वादळी खेळी केली. यामध्ये त्याने 6 फोर आणि 7 सिक्सर्स लगावले. त्याचा स्ट्राईक रेट 331.82 इतका होता. याशिवाय हरियाणाविरुद्धही त्याने 25 चेंडूत 64 धावा केल्या होत्या. या स्पर्धेत त्याने 7 सामन्यांत एकूण 329 धावा केल्या आहेत. इतकी जबरदस्त कामगिरी केल्यानंतर शेवटच्या टप्प्यात त्याचा आयपीएल टीममध्ये समावेश झालाय. त्यामुळे सरफराजच्या फॅनमध्ये आनंदाचं वातावरण आहे.