Lungi Ngidi Injury: आयपीएल 2026 च्या मैदानात शनिवारी घडलेल्या प्रकारामुळे क्रिकेटप्रेमींचा काळजाचा ठोका चुकला. दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर सुरू असलेल्या दिल्ली आणि पंजाबमधील सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा स्टार बॉलर लुंगी एन्गिडी याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. मैदानात रुग्णवाहिका आली, खेळ 15 मिनिटे थांबला आणि अखेर दिल्ली पोलिसांनी 'ग्रीन कॉरिडॉर' करत एन्गिडीला अवघ्या 11 मिनिटांत हॉस्पिटलला पोहोचवले.
नेमकं काय घडलं?
पंजाबच्या इनिंगमधील तिसऱ्या ओव्हरमध्ये प्रियांश आर्यने मारलेला शॉट टिपण्यासाठी लुंगी एन्गिडी धावला. बाउंड्री जवळ कॅच घेताना एन्गिडीचा अंदाज चुकला आणि तो पाठीमागच्या बाजूला जोरात कोसळला. पडताना त्याचे डोके थेट जमिनीवर आदळले. एन्गिडीच्या हालचाली थांबल्याचे पाहून दोन्ही टीमचे खेळाडू आणि डॉक्टर तातडीने त्याच्या दिशेने धावले. मैदानावर सन्नाटा पसरला होता आणि सर्वत्र चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते.
मैदानात ॲम्ब्युलन्स आणि मानेला 'नेक ब्रेस'
एन्गिडीला मानेला आणि डोक्याला प्रचंड वेदना होत होत्या. तो हाताने खुणा करत असला तरी त्याला मान हलवता येत नव्हती. त्यामुळे डॉक्टरांनी खबरदारी म्हणून त्याच्या मानेला 'नेक ब्रेस' लावले. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून मैदानावरच रुग्णवाहिका बोलावण्यात आली. एन्गिडीला स्ट्रेचरवरून रुग्णवाहिकेत नेण्यात आले आणि खेळ सुमारे 15 मिनिटे थांबवण्यात आला होता.
11 मिनिटांचा ग्रीन कॉरिडॉर आणि पोलिसांची तत्परता
मैदानाबाहेर दिल्लीच्या रहदारीत रुग्णवाहिका अडकू नये म्हणून दिल्ली ट्रॅफिक पोलिसांनी युद्धपातळीवर हालचाली केल्या. एसीपी संजय सिंह यांनी तात्काळ नियंत्रण कक्षाशी संपर्क साधून 'ग्रीन कॉरिडॉर' तयार करण्याचे आदेश दिले. ट्रॅफिक पोलिसांनी रस्ते मोकळे केल्यामुळे रुग्णवाहिकेला बीएलके-मॅक्स सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलपर्यंतचे अंतर कापण्यासाठी फक्त 11 मिनिटे लागली. गर्दीच्या वेळी पोलिसांनी दाखवलेल्या या तत्परतेमुळे एन्गिडीवर तातडीने उपचार सुरू होऊ शकले.
एन्गिडीची प्रकृती स्थिर, चाहत्यांना दिलासा
हॉस्पिटलमधून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, लुंगी एन्गिडीची प्रकृती आता स्थिर आहे. त्याला निरीक्षणाखाली ठेवण्यात आले असून लवकरच डिस्चार्ज मिळण्याची शक्यता आहे. दरम्यान, दिल्ली कॅपिटल्सने नियमानुसार एन्गिडीच्या जागी विप्रज निगमला 'कन्कशन सबस्टिट्यूट' म्हणून मैदानात उतरवले. एन्गिडीच्या या दुखापतीनंतर त्याचे सहकारी डेव्हिड मिलर आणि ट्रिस्टन स्टब्स काही काळ भावूक झाले होते, तर पंजाबचा कोच रिकी पाँटिंगनेही मैदानावर येत एन्गिडीच्या तब्येतीची विचारपूस केली.