IPL 2026, MI vs CSK : आयपीएल 2026 मध्ये गुरुवारी मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स (Mumbai Indians vs Chennai Super Kings) यांच्यात झाला. या दोन्ही टीमनं आजवर प्रत्येकी पाच वेळा आयपीएल विजेतेपद मिळवले आहे. स्पर्धेच्या इतिहासातील सर्वात यशस्वी दोन टीममधील लढतीची सर्वच क्रिकेट फॅन्सना उत्सुकता असते. या प्रतिष्ठेच्या लढाईत चेन्नई सुपर किंग्सनं बाजी मागली. सीएसकेनं हा सामना 103 रन्सनं जिंकला. मुंबईचा संपूर्ण डाव 104 धावांत आटोपला.
मुंबई इंडियन्सची खराब सुरुवात
चेन्नई सुपर किंग्सनं मुंबई इंडियन्ससमोर विजयासाठी 208 रन्सचं लक्ष्य ठेवलं होतं. त्याचा पाठलाग करताना मुंबई इंडियन्सची सुरुवात खराब झाली. मुंबईची टॉप ऑर्डर झटपट परतली. अवघ्या 11 रन्समध्ये मुंबईनं टॉपचे 3 बॅटर गमावले.मुंबई इंडियन्सला पॉवर प्लेचा फायदा उठवता आला नाही. त्यांनी पहिल्या 6 ओव्हर्समध्ये 3 विकेट्सच्या मोबदल्यात 29 रन्स केले.
तिलक वर्मा आणि सूर्यकुमार यादवने इनिंग सावरत चौथ्या विकेटसाठी 56 बॉलमध्ये 73 रन्सची पार्टनरशिप केली. वेगानं रन करण्याच्या नादात तिलक वर्मानं 37 रन्स केले. तिलकपाठोपाठ हार्दिक पांड्या आणि रदरफोर्डही झटपट आऊट केली.
( नक्की वाचा : Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीची 'या' बॉलरपुढं शरणागती, मेडन ओव्हर खेळली आणि विकेटही गेली! सर्वत्र चर्चा )
संजूची सेंच्युरी
त्यापूर्वी संजू सॅमसनची नाबाद सेंच्युरी हे चेन्नई सुपर किंग्सच्या इनिंगचं वैशिष्ट्य ठरलं. T20 वर्ल्ड कप गाजवलेल्या संजूचा फॉर्म या आयपीएलमध्येही कायम आहे. त्यानं या सिझनमधील दुसरी सेंच्युरी सीएसकेच्या इनिंगच्या शेवटच्या बॉलवर पूर्ण केली.
संजूनं 54 बॉलमध्ये 10 फोर आणि 6 सिक्सच्या मदतीनं नाबाद 101 रन केले. संजूनं यापूर्वी दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध सेंच्युरी झळकावली होती. त्यानंतर संजूनं मुंबईलाही बॅटनं पाणी पाजलं. आयपीएलच्या इतिहासात मुंबई इंडियन्सविरुद्ध सेंच्युरी करणारा संजू सॅमसन हा सीएसकेचा पहिला खेळाडू आहे.
संजूचा अपवाद वगळता सीएसकेच्या अन्य खेळाडूला मोठा स्कोअर करता आला नाही. ऋतुराज गायकवाडनं चांगली सुरुवात केली होती. पण तो 22 रन्सवर आऊट झाला. तर डेवाल्ड ब्रेविसनं 21 रन्स केले.