Vaibhav Sooryavanshi: आयपीएल 2026 मध्ये सध्या एकाच नावाची चर्चा आहे आणि ते नाव म्हणजे राजस्थान रॉयल्सचा 15 वर्षांचा वाघ वैभव सूर्यवंशी. मैदानात उतरल्यावर हा मुलगा ज्या पद्धतीने जगातील दिग्गज बॉलरची धुलाई करतोय, ते पाहून आता सीमेपलीकडूनही तोंडभरून कौतुक व्हायला लागलं आहे. पाकिस्तानच्या एका क्रिकेट तज्ज्ञाने तर वैभवचं कौतुक करताना चक्क 'त्याला लॅबमध्ये नेऊन तपासा' असं वक्तव्य केलं आहे. वैभवची बॅटिंग पाहून हा माणूस आहे की एखादं मशीन, असा प्रश्न आता क्रिकेट विश्वाला पडला आहे.
काय आहे नेमकं वक्तव्य?
पाकिस्तानमधील प्रसिद्ध क्रिकेट तज्ज्ञ नौमान नियाज एका शोमध्ये बोलताना वैभव सूर्यवंशीच्या खेळानं भलतेच प्रभावित झाले. ते गमतीने म्हणाले की, राजस्थान रॉयल्सच्या या ओपनरमध्ये नक्कीच एखादी एआय (AI) चिप बसवलेली असावी. ज्या सहजतेने हा 15 वर्षांचा मुलगा सिक्स मारतो, ते पाहून सामान्य मानवी क्षमतेवर विश्वास ठेवणं कठीण झालं आहे.
वाडा (WADA) ज्याप्रमाणे खेळाडूंची डोपिंग टेस्ट करते, तसंच वैभवला एखाद्या लॅबमध्ये नेऊन तपासायला हवं, कारण त्याचा खेळ पूर्णपणे अवास्तव वाटतो, असं वक्तव्य नियाज यांनी केलं.
( नक्की वाचा : IPL च्या झगमगाटात एकमेव मराठी टक्का! 40 स्टार्टअप्स उभारणाऱ्या धुळ्याच्या धुरंधरनं कशी विकत घेतली स्वतःची टीम? )
विराट चॅम्पियन झाला तेव्हा वैभवचा जन्म झाला होता
वैभवच्या वयाबद्दल बोलताना नौमान नियाज यांनी एक रंजक गोष्ट सांगितली. ते म्हणाले की, वैभव अवघा 15-16 वर्षांचा आहे. जेव्हा त्याचा जन्म झाला, तेव्हा विराट कोहली आधीच जगज्जेता बनला होता. तरीही आज हा मुलगा ज्या आत्मविश्वासाने खेळतोय, ते थक्क करणारं आहे. त्याच्याकडे केवळ ताकद नाही, तर त्याच्या मनगटाचा वापर आणि बॅट फिरवण्याचा कोन (Arc) इतका जबरदस्त आहे की, त्यामुळे तो इतरांपेक्षा वेगळा ठरतो. वयाच्या 18 व्या वर्षी शरीरात हार्मोनल बदल होऊन ताकद वाढते, मग 15 व्या वर्षीच तो असा खेळत असेल, तर पुढे काय होईल, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.
ऑरेंज कॅपसाठी वैभव तगडा दावेदार
वैभव सूर्यवंशी सध्या आयपीएल 2026 मध्ये सर्वाधिक रन करणाऱ्या बॅटरच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्याने आतापर्यंत 8 मॅचमध्ये 357 रन कुटले आहेत. विशेष म्हणजे त्याचा स्ट्राईक रेट 234 पेक्षा जास्त आहे, जो टी-20 क्रिकेटमध्ये अत्यंत घातक मानला जातो. या सीझनमध्ये त्याने एक शानदार सेंच्युरी झळकावलं असून तो आता ऑरेंज कॅप आपल्या नावावर करण्यासाठी सज्ज झाला आहे.
( नक्की वाचा : IPL 2026 : मैदानात अनर्थ घडला, पण पुढच्या 11 मिनिटांत जे झालं तो चमत्कारच! एन्गिडीसाठी दिल्ली पोलिसांनी... )
वैभवच्या या कामगिरीने केवळ भारतच नाही, तर संपूर्ण जग भारावून गेलं आहे. पाकिस्तानमधील तज्ज्ञांनी ज्या पद्धतीने त्याच्या खेळाचं विश्लेषण केलं आहे, त्यावरून वैभव सूर्यवंशी हे नाव आगामी काळात जागतिक क्रिकेटवर राज्य करणार, हे स्पष्ट दिसत आहे. लॅबमध्ये तपासणी करण्याचं वक्तव्य हे त्याच्या अफाट कौशल्यासाठी दिलेलं एक 'कॉम्प्लिमेंट' मानलं जात आहे.