Ranji Trophy Final: जम्मू-काश्मीरने इतिहास घडवला! कर्नाटकचा पराभव करत पहिल्यांदाच बनले रणजी ट्रॉफीचे राजे

Jammu Kashmir Ranji Trophy Winner 2026: जम्मू आणि काश्मीरने क्रिकेटच्या मैदानात नवा इतिहास रचला आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
Jammu Kashmir Ranji Trophy Winner 2026: हा विजय केवळ एका सामन्याचा नसून जम्मू-काश्मीरच्या क्रिकेटमधील एका नव्या युगाची सुरुवात आहे.
मुंबई:

Jammu Kashmir Ranji Trophy Winner 2026: जम्मू आणि काश्मीरने क्रिकेटच्या मैदानात नवा इतिहास रचला आहे. रणजी ट्रॉफी 2025-26 च्या फायनलमध्ये कर्नाटकचा पराभव करत जम्मू आणि काश्मीरने पहिल्यांदाच विजेतेपद पटकावले. हा विजय केवळ एका सामन्याचा नसून जम्मू-काश्मीरच्या क्रिकेटमधील एका नव्या युगाची सुरुवात आहे. पहिल्या डावात घेतलेल्या भक्कम आघाडीच्या जोरावर जम्मू-काश्मीरने हे ऐतिहासिक यश संपादन केले.

पहिल्या इनिंगमध्ये डोंगराएवढे टार्गेट

फायनलमध्ये टॉस जिंकल्यानंतर जम्मू-काश्मीरने पहिल्यांदा बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला आणि तो पूर्णपणे सार्थ ठरवला. पहिल्या डावात त्यांनी तब्बल 584 रन्सचा डोंगर उभा केला. यामध्ये शुभम पुंडीर याने अप्रतिम खेळ करत 121 रन्सची सेंच्युरी झळकावली. त्याच्या या खेळीमुळे जम्मू-काश्मीरला सामन्यावर पकड मिळवता आली. कर्नाटकच्या बॉलर्सना सुरुवातीपासूनच दबावाखाली ठेवत बॅटर्सनी मैदानावर चौफेर फटकेबाजी केली.

कर्नाटकची बॅटिंग  कोसळली

जम्मू-काश्मीरच्या पहाडासारख्या स्कोअरचा पाठलाग कर्नाटकच्या बलाढ्य बॅटिंग ऑर्डरला करता आली नाही. टीम इंडियातील पदार्पणाच्या उंबरठ्यावर असलेला जम्मू-काश्मीरचा फास्ट बॉलर आकिब नबी याने कर्नाटकच्या बॅटर्सना अक्षरशः नाचवले. त्याने धारदार बॉलिंग करत 5 विकेट्स घेतल्या. कर्नाटकची पहिली इनिंग 293 रन्सवर आटोपली. 

कर्नाटककडून अनुभवी मयंक अग्रवाल याने एकाकी झुंज देत 160 रन्सची शानदार सेंच्युरी केली, पण त्याला दुसऱ्या कोणत्याही बॅटरची साथ मिळाली नाही. यामुळे जम्मू-काश्मीरला पहिल्या डावात 291 रन्सची मोठी लीड मिळाली.

Advertisement

दुसऱ्या इनिंगमध्येही जम्मू-काश्मीरचा दबदबा

दुसऱ्या इनिंगमध्ये बॅटिंगला उतरल्यावर जम्मू-काश्मीरने कर्नाटकला सामन्यात परतण्याची कोणतीही संधी दिली नाही. त्यांनी दुसऱ्या डावात 4 विकेट्स गमावून 342 रन्स केले. कमरान इक्बाल याने जबरदस्त खेळ करत नाबाद 160 रन्स केले, तर साहिल लोत्रा याने आपल्या फर्स्ट क्लास करिअरमधील पहिली सेंच्युरी झळकावत कर्नाटकच्या बॉलर्सचे कंबरडे मोडले. 

ऐतिहासिक विजयावर शिक्कामोर्तब

साहिलच्या सेंच्युरीनंतर जम्मू काश्मीरचा कॅप्टन पारस डोग्रानं इनिंग घोषित केली. त्यानंतर दोन्ही टीमच्या संमतीने सामना ड्रॉ करण्याचा निर्णय घेण्यात आला. रणजी ट्रॉफीच्या नियमानुसार,फायनलमध्ये ज्या टीमला पहिल्या डावात लीड मिळते, ती टीम विजयी ठरते. त्यामुळे पहिल्या डावातील 291 रन्सच्या मोठ्या आघाडीच्या जोरावर जम्मू आणि काश्मीरने रणजी ट्रॉफीचे चॅम्पियन पद पटकावले. जम्मू-काश्मीरच्या खेळाडूंनी मैदानावर एकच जल्लोष केला, कारण त्यांच्या क्रिकेट इतिहासातील ही सर्वात मोठी आणि अभिमानास्पद कामगिरी ठरली आहे.

Advertisement
Topics mentioned in this article