MCA President Election : मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत शेवटच्या क्षणी ट्वि्स्ट आला आहे. अमोल काळे यांच्या अकस्मिक निधानंतर ही निवडणूक होत आहे. MCA च्या अध्यक्षपदासाठी अर्ज न भरण्याचा निर्णय काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी घेतला आहे. नाना पटोले यांनी काही दिवसांपूर्वी माझगाव क्रिकेट क्लबचं सदस्यत्व घेतलं आहे. त्यानंतर अध्यक्षपदाची निवडणूक लढवणार अशी चर्चा सुरु होती. पण पटोले यांनी शेवटच्या क्षणी अर्ज न भरण्याचा निर्णय घेतला आहे. MCA अध्यक्षपदासाठी अर्ज भरण्याची आज (बुधवार, 10 जुलै) शेवटची तारीख होती.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
अध्यक्षपदासाठी तिरंगी लढत
MCA अध्यक्षपदासाठी नाना पटोले यांनी आता भूषण पाटील यांना पाठिंबा दिला आहे. भूषण पाटील यांना काँग्रेस पक्षाचा पाठिंबा आहे. भूषण पाटील हे काँग्रेसचे नेते असून त्यांनी उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातून पीयूष गोयल यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती. भूषण पाटील यांना अजिंक्य नाईक आणि संजय नाईक यांचं आव्हान आहे. अजिंक्य नाईक हे बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष हितेंद्र ठाकूर यांचे जावाई असून MCA चे विद्यमान सचिव आहेत.
( नक्की वाचा : द्रविडनं विजेतेपद मिळवून दिलं, नवा हेड कोच गंभीरसमोर आहेत 5 मोठी आव्हानं )
भारत-पाकिस्तान मॅचनंतर काळे यांचं निधन
मुंबई क्रिकेट असोसिएशनचे यापूर्वीचे अध्यक्ष अमोल काळे यांचं T20 वर्ल्ड कप मधील भारत-पाकिस्तान सामन्यानंतर निधन झालं. काळे यांचं ऱ्हदयविकाराच्या तीव्र धक्क्यानं मृत्यू झालाय. ते 47 वर्षांचे होते. न्यूयॉर्कमध्ये झालेला भारत-पाकिस्तान सामना पाहण्यासाठी ते स्टेडियममध्ये उपस्थित होते. मॅच संपल्यानंतरच त्यांच्या ऱ्हदयविकाराचा तीव्र धक्क्यानं त्यांचं निधन झालं.
अमोल काळे यांची ऑक्टोबर 2022 मध्ये मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या (MCA) अध्यक्षपदी निवड झाली होती. भारतीय क्रिकेटची मुंबई पंढरी मानली जाते. त्यामुळे या असोसिएशनच्या अध्यक्षपदाला मोठं महत्त्व आहे. अमोल काळे यांनी माजी क्रिकेटपटू संदीप पाटील यांचा या निवडणुकीत 25 मतांनी पराभव केला होता.