- पाकिस्तान हॉकी संघाला ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर हॉटेल बुकिंग न मिळाल्याने फुटपाथवर राहावे लागले
- संघाला सिडनी विमानतळावर ताटकळत १३ ते १४ तास थांबावे लागले
- पाकिस्तानी खेळाडूंवर भांडी घासण्याची वेळ आली
पाकिस्तानच्या खेळाडूंवर भांडी घासण्याची वेळ आली. ऐवढेच काय तर फुटपाथवर राहण्याची ही वेळ आली. हा धक्कादायक प्रकार समोर आल्यानंतर क्रिडा विश्वात एकच खळबळ उडाली आहे. हा सर्व प्रकार पाकिस्तानच्या हॉकी संघा सोबत घडला. ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरून मायदेशी परतलेल्या पाकिस्तान हॉकी संघाचा कर्णधार शकील अम्माद बट याने पाकिस्तान हॉकी महासंघाच्या (PHF) कारभाराचे वाभाडे काढले आहेत. "हॉटेलमध्ये बुकिंग नसल्यामुळे आम्हाला रस्त्यावर भटकावे लागले. सामन्यापूर्वी स्वतःची भांडीही घासावी लागली," असा खळबळजनक खुलासा बट याने लाहोर विमानतळावर पत्रकारांशी बोलताना केला. महासंघाच्या या वर्तणुकीमुळे खेळाडूंचे मानसिक खच्चीकरण झाल्याचे त्याने नमूद केले.
सिडनी विमानतळावर संघाला 13 ते 14 तास ताटकळत राहावे लागले. कॅनबेरा येथे पोहोचल्यावर हॉटेलचे पैसे न भरल्यामुळे खेळाडूंना प्रवेश नाकारण्यात आला. ऐन सामन्याच्या आदल्या दिवशी खेळाडूंना स्वस्त पर्यायांचा शोध घ्यावा लागला. ज्याचा परिणाम कामगिरीवर झाला. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या सामन्यात पाकिस्तानला 2-3 ने पराभव स्वीकारावा लागला. पाकिस्तान क्रीडा मंडळाने (PSB) या दौऱ्यासाठी 1 कोटी रुपयांहून अधिक निधी दिला होता.
नक्की वाचा - IND vs PAK: 'तो' 10 ओव्हर खेळला तर सामना संपलाच समजा' 'या' खेळाडूची शोएब अख्तरलाही धडकी
तरीही खेळाडूंना अशा परिस्थितीला सामोरे जावे लागले. या प्रकरणाची गंभीर दखल घेत पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी सखोल चौकशीचे आदेश दिले आहेत. बट म्हणाला की, खेळाडूंना 10 दिवसांचे हॉटेल बुक असल्याचे सांगण्यात आले होते. प्रत्यक्षात 13 दिवस ठेवले गेले. शेवटचे 3 दिवस अत्यंत निकृष्ट दर्जाच्या हॉटेलमध्ये राहावे लागले असा आरोप ही त्याने केला आहे. "जर आम्हाला प्रगती करायची असेल, तर विदेशी प्रशिक्षक आणि सक्षम व्यवस्थापनाची गरज आहे," असेही त्याने स्पष्ट केले.
खेळाडूंनी मीडियाशी बोलू नये म्हणून त्यांना धमकावण्यात आले होते. मात्र परिस्थिती हाताबाहेर गेल्यामुळे सत्य समोर आणणे गरजेचे असल्याचे त्याने सांगितले. या सर्व प्रकारानंतर पाकिस्तानात संताप व्यक्त होत आहे. पंतप्रधानांनी या प्रकरणाची चौकशी करण्याचे निर्देश दिले आहेत. 1 कोटी रुपये नेमके कुठे खर्च झाले, असा सवाल आता विचारला जात आहे. पाकिस्तान क्रीडा मंडळाच्या महासंचालक नूर उस सबाह यांनी सांगितले की, या दौऱ्यासाठी दिलेला निधी नेमका कुठे गेला, याची चौकशी सुरू आहे. खेळाडूंना दिलेल्या धमक्या आणि त्यांची झालेली मानहानी यामुळे पाकिस्तान हॉकी विश्वात मोठी खळबळ उडाली आहे.