Paris Paralympics 2024 : पॅरिसमध्ये सुरु असलेल्या पॅरालिम्पिकमध्ये भारतीय खेळाडूंची धडाकेबाज कामगिरी सुरु आहे. या स्पर्धेच्या 9 व्या दिवशी (शुक्रवार 5 सप्टेंबर) प्रवीणकुमारनं भारताला गोल्ड मेडल मिळवून दिलं. प्रवीणनं उंच उडीमधील T64 प्रकारात गोल्ड मेडल पटकावलं.
यापूर्वी टोक्योमध्ये 2021 साली झालेल्या पॅरालिम्पिक स्पर्धेत भारतानं 25 पदकांची कमाई केली होती. भारतानं या स्पर्धेत आत्तापर्यंत 6 गोल्ड मेडल, 9 सिल्व्हर आणि 11 ब्रॉन्झ मेडलची कमाई केली आहे.
प्रवीणचं सलग दुसरं पॅरालिम्पिक मेडल
प्रवीण कुमारनं शुक्रवारी झालेल्या स्पर्धेत 2.08 मीटर उंच उडी मारत गोल्ड मेडल पटकावलं. हा प्रवीणचा वैयक्तिक तसंच आशियातील सर्वोत्तम रेकॉर्ड आहे. त्यानं यापूर्वी टोक्यो पॅरालिम्पिक स्पर्धेत 2.07 मीटर उंच उडी मारत सिल्व्हर मेडल पटकावलं होतं. पॅरिस पॅरालिम्पिक स्पर्धेत शरद कुमार आणि मरियप्पन थागावेलू यांच्यानंतर पदक जिंकणारा तो तिसरा भारतीय आहे.
( नक्की वाचा : Paralympics 2024 : शटलर नितेश कुमारनं जिंकलं गोल्ड मेडल, भारताला मिळालं 9 वं पदक )
कपिल परमारला ब्रॉन्झ
यापूर्वी कपिल परमारनं गुरुवारी भारताला ब्रॉन्झ मेडल जिंकून दिलं. पुरुषांच्या ज्युडो J-1 प्रकारत त्यानं हे मेडल जिंकलं. कपिलनं ब्राझिलच्या एलिटन डी ओलिविएराचा फक्त 33 सेकंदमध्ये 10-0 असा पराभव केला. गुरुवारी दिवसभरात भारताला फक्त एक मेडल मिळालं.