Champions Trophy 2025 : पाकिस्तान आणि युएईमध्ये होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेपूर्वी ऑस्ट्रेलिया टीमला मोठा धक्का बसला आहे. ऑस्ट्रेलिया टीमचा कॅप्टन आणि फास्ट बॉलर पॅट कमिन्स चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेसाठी फिट होण्याची शक्यता अत्यंत कमी आहे. ऑस्ट्रेलियचा हेड कोच अॅण्ड्रयू मॅकडोनाल्ड यांनी हा खुलासा केला आहे.
भारताविरुद्धची बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी जिंकल्यानंतर कमिन्स क्रिकेटपासून दूर आहे. तो दुसऱ्या मुलाच्या जन्मामुळे श्रीलंका दौऱ्यावर गेला नाही. त्याचबरोबर कमिन्सचा घोटा दुखावला असून त्यानं अद्याप ट्रेनिंग सुरु केलेली नाही. तो चॅम्पिन्स ट्रॉफीपूर्वी फिट होण्याची शक्यता कमी आहे, असं मॅकडोनाल्ड यांनी सांगितलं.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
कोण होणार कॅप्टन?
पॅट कमिन्स फिट होणार नाही हे जवळपास स्पष्ट झाल्यानं ऑस्ट्रेलियाच्या तयारीला धक्का बसला आहे. कमिन्सच्या नेतृत्त्वाखालीच ऑस्ट्रेलियानं वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप तसंच वन-डे वर्ल्ड कप 2023 जिंकला आहे. त्याचबरोबर दहा वर्षांनी भारताविरुद्धची बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी जिंकण्याची कामगिरीही केली आहे. आयसीसीच्या महत्त्वाच्या स्पर्धेत अनुभवी आणि यशस्वी कॅप्टन नसणे हा ऑस्ट्रेलियासाठी मोठा धक्का मानला जात आहे.
कमिन्स फिट नसल्यानं ऑस्ट्रेलियाचा कॅप्टन कोण होणार? हा प्रश्न विचारला जात आहे. हेड कोच मॅकडोनाल्ड यांनी दोन जणांच्या नावावर विचार असल्याचं सांगितलं. स्टीव्ह स्मिथ आणि ट्रॅव्हिस हेड या दोन खेळाडूंसोबत आम्ही चॅम्पियन्स ट्रॉफीची टीम निवडताना चर्चा करत होतो. तेव्हा पॅट (कमिन्स) स्वदेशी परतला होता. या दोघांचा आम्ही नेतृत्त्वासाठी विचार करु,' असं त्यांनी स्पष्ट केलं.
( नक्की वाचा : Jasprit Bumrah बुमराहनं इतिहास घडवला ! ICC चा हा सन्मान मिळवणारा पहिला भारतीय )
मॅकडोनाल्ड यांनी सांगितलं की, ते दोघं (स्मिथ आणि हेड) प्रमुख खेळाडू आहेत. स्टीव्हनं इथं (श्रीलंका सीरिज) पहिल्या टेस्टमध्ये जोरदार कामगिरी केली आहे. त्यानं संपूर्ण कारकिर्दीत वन-डे इंटरनॅशनल चांगली कामगिरी केली आहे.
ऑस्ट्रेलियाला चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेपूर्वी तीन बदल करावे लागू शकतात. कारण अनुभवी ऑल राऊंडर मिचेल मार्श पाठदुखीमुळे स्पर्धेतून बाहेर झाला आहे. तसंच फास्ट बॉलर जोश हेजलवुड देखील अजून दुखापतीमधून पूर्णपणे बरा झालेला नाही. '
ICC चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी 15 खेळाडूंची अंतिम यादी सादर करण्याची शेवटची तारीख 12 फेब्रुवारी आहे. ऑस्ट्रेलियाचा माजी कॅप्टन रिकी पॉन्टिंगनं नुकताच मिचेल मार्शच्या जागी मिच ओवेनची निवड करावी असा सल्ला दिला आहे. तर सीन एबॉट आणि स्पेंसर जॉन्सन या फास्ट बॉलर्सचाही पर्याय ऑस्ट्रेलियन निवड समितीसमोर उपलब्ध आहे.