Prithvi Shaw Akriti Agarwal: भारताचा धडाकेबाज बॅटर पृथ्वी शॉ आणि त्याची होणारी पत्नी, अभिनेत्री आकृती अग्रवाल यांच्या नात्यात सध्या काहीतरी बिनसल्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. अवघ्या काही महिन्यांपूर्वीच साखरपुडा करून नव्या आयुष्याची सुरुवात करणाऱ्या या जोडीमध्ये अचानक दुरावा आल्याचे संकेत मिळत आहेत. आकृती अग्रवाल हिने सोशल मीडियावर लागोपाठ केलेल्या दोन गूढ पोस्ट्समुळे नेटिझन्समध्ये विविध चर्चांना उधाण आले असून, नात्यात फसवणूक आणि गैरसमज झाल्याचे या पोस्टमधून सुचवण्यात आले आहे. त्यामुळे क्रिकेट आणि मनोरंजन विश्वात या जोडीबद्दल सध्या मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.
नेमकं काय घडलं?
रविवारी आकृती अग्रवाल हिने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर पहिली पोस्ट शेअर केली, ज्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. तिने या पोस्टमध्ये लिहिले होते की, माझी अनेक वेळा फसवणूक झाली, तरीही मी कधीच एक शब्दही बोलले नाही. एक पाऊल पुढे टाकल्यानंतरही यावर अजूनही विश्वास बसत नाहीये.
आकृतीने कोणाचेही थेट नाव न घेता पुढे लिहिले की, प्रत्येक गोष्ट खरी आहे, प्रत्येक अफवा खरी आहे. सोशल मीडियावर त्याच्याबद्दल तुम्हाला जे काही दिसते आहे, ते सर्व खरे आहे. आकृतीच्या या पोस्टनंतर सोशल मीडियावर पृथ्वी शॉ याने तिची फसवणूक केल्याच्या चर्चा वेगाने पसरू लागल्या.
दुसरी गूढ पोस्ट
पहिली पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाल्यानंतर आणि सर्वत्र पृथ्वी शॉ याच्यावर आरोप होऊ लागल्यानंतर आकृतीने लगेचच दुसरी पोस्ट शेअर केली. या दुसऱ्या पोस्टमध्ये तिने लिहिले की, अनेकांकडून गैरसमज झाला! मात्र, तिने या पोस्टमधून नेमका कोणाचा गैरसमज झाला, स्वतःचा की लोकांनी तिच्या पहिल्या पोस्टचा चुकीचा अर्थ काढला, याबाबत कोणतेही स्पष्टीकरण दिलेले नाही.
या संपूर्ण प्रकरणावर पृथ्वी शॉ याने अजून कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही, तसेच आकृतीनेही अधिकृतपणे काहीही सांगितलेले नाही. विशेष म्हणजे, या वादाच्या चर्चांनंतरही त्या दोघांनी अद्याप सोशल मीडियावर एकमेकांना अनफॉलो केलेले नाही.
काही महिन्यांपूर्वीच झाला होता साखरपुडा
पृथ्वी शॉ आणि आकृती अग्रवाल यांचा याच वर्षी मार्च महिन्यात साखरपुडा झाला होता. त्यावेळी दोघांनी एकत्र पोस्ट शेअर करत चाहत्यांना ही गूड न्यूज दिली होती. मैदानावर सिक्स मारण्यापासून ते मैदानाबाहेर आयुष्यभराची हिट इनिंग खेळण्यापर्यंत, ती माझी परफेक्ट इनिंग आहे, असे कॅप्शन पृथ्वीने दिले होते.
त्यानंतर आकृतीच्या वाढदिवसालाही पृथ्वीने तिच्यासाठी अत्यंत रोमँटिक पोस्ट लिहिली होती. प्रत्येक चढ-उतारात तू माझ्यासोबत खंबीरपणे उभी राहिलीस आणि आपल्या नात्याची साथ सोडली नाहीस, असे पृथ्वीने म्हटले होते. आकृतीच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर अजूनही त्यांच्या साखरपुड्याचे फोटो पिन केलेले आहेत.
( नक्की वाचा : शोएब अख्तरच्या घरात दिसले 26/11 च्या मास्टरमाईंडचे सहकारी, पाकिस्तानचा बुरखा पुन्हा एकदा जगासमोर फाटला )
कोण आहे आकृती अग्रवाल?
आकृती अग्रवाल ही एक अभिनेत्री असून तिने याच वर्षी प्रदर्शित झालेल्या त्रिमुख या तेलगू चित्रपटात काम केले आहे. राजेश नायडू यांचे लेखन आणि दिग्दर्शन असलेल्या या चित्रपटाची निर्मिती अखिरा ड्रीम क्रिएशन्सच्या बॅनरखाली करण्यात आली होती. या चित्रपटात आकृतीसोबतच बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओनी, योगेश कल्ले, आदित्य श्रीवास्तव, राजेंद्रन आणि सुमन यांच्याही महत्त्वाच्या भूमिका होत्या. व्यावसायिक आयुष्यात पुढे जात असतानाच आता आकृतीच्या वैयक्तिक आयुष्यातील या पोस्ट्समुळे ती प्रचंड चर्चेत आली आहे.