Rajat Patidar RCB captain story : क्रिकेटच्या मैदानावर अनेकदा खेळाडूंच्या जिद्दीचे किस्से आपण ऐकले असतील, पण सध्या आरसीबीच्या एका वाघाची चर्चा संपूर्ण जगात रंगली आहे. ज्या बॅटरनं आरसीबीला पहिल्यांदा चॅम्पियन बनवलं आणि आता सलग दुसऱ्यांदा फायनलमध्ये नेलंय, त्यानं या टीमसाठी जे केलंय ते ऐकून तुम्हालाही अभिमान वाटेल. आरसीबीचा कॅप्टन रजत पाटीदार यानं टीमकडून खेळण्यासाठी स्वतःच्या लग्नाची तारीखच पुढं ढकलली होती.
ही घटना आहे आयपीएल 2022 ची. त्यावर्षीच्या लिलावात रजतला कोणत्याही टीमनं विकत घेतलं नव्हतं. तो अनसोल्ड राहिल्यामुळे साहजिकच निराश झाला होता. घरी क्रिकेटपेक्षा आता संसाराच्या गप्पा रंगू लागल्या होत्या. घरच्यांनी त्याचं लग्न ठरवलं आणि 9 मे रोजी इंदूरमध्ये लग्नाचा मुहूर्तही काढला. लग्नासाठी हॉटेल बुकिंगपासून सर्व तयारी झाली होती, पण नशिबात काहीतरी वेगळंच लिहिलं होतं.
आरसीबीमध्ये एन्ट्री आणि लग्नाला 'ब्रेक'
आरसीबीचा एक खेळाडू लवनीत सिसोदिया दुखापतग्रस्त झाला आणि ऐनवेळी रजत पाटीदारला रिप्लेसमेंट म्हणून बोलावणं आलं. केवळ 20 लाख रुपयांमध्ये रजतला आरसीबीमध्ये सहभागी होण्याची ऑफर देण्यात आली. त्यावेळी रजतनं एक क्षणही विचार केला नाही आणि केवळ 24 तासांच्या आत आपलं ठरलेलं लग्न पुढं ढकलण्याचा निर्णय घेतला. क्रिकेटबद्दलच्या या निष्ठेमुळोच तो आज यशाच्या शिखरावर आहे.
( नक्की वाचा : IPL 2026: RCB 'फायनली' तयार, विजेतेपदापासून एक पाऊल दूर, वाचा कॅप्टनच्या खेळीनं कसं बदललं टीमचं भविष्य! )
लग्नापेक्षा टीमला दिलं महत्त्व
रजतचे वडील मनोहर पाटीदार यांनी त्यावेळी सांगितलं होतं की, रजतनं आयपीएलला महत्त्व दिलं आणि मग आम्हीही लग्नाचं बुकिंग कॅन्सल केलं. त्या मोसमात रजतनं एलिमिनेटर मॅचमध्ये लखनऊविरुद्ध फक्त 54 बॉलमध्ये नाबाद 112 रन कुटले आणि तो आयपीएल प्लेऑफमध्ये सेंच्युरी ठोकणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला. तिथून सुरू झालेला त्याचा प्रवास आज आरसीबीच्या कॅप्टन्सीपर्यंत पोहोचला आहे.
इतिहास रचण्यापासून फक्त एक पाऊल दूर
रजत पाटीदारच्या कॅप्टन्सीखाली आरसीबीने आयपीएल 2025 मध्ये पंजाब किंग्सला हरवून तब्बल 17 वर्षांचा दुष्काळ संपवला आणि पहिल्यांदा ट्रॉफी उचलली. आता आयपीएल 2026 मध्येही आरसीबीनं क्वालिफायर 1 मध्ये गुजरात टायटन्सला धूळ चारत फायनल गाठली आहे. रविवारी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर फायनल होणार आहे. जर आरसीबीनं ही मॅच जिंकली, तर चेन्नई (2010, 2011) आणि मुंबई (2019, 2020) नंतर बॅक टू बॅक ट्रॉफी जिंकणारी ती तिसरी टीम ठरेल.
( नक्की वाचा : IPL 2026: 6, 6, 6, 6, 6, 6, 6... वैभव सूर्यवंशीनं मोडला ख्रिस गेलचा सर्वात मोठा रेकॉर्ड, मिळालं नवं नाव! )
रजत पाटीदारची आयपीएलमधील कामगिरी
रजतनं आतापर्यंत 56 मॅच खेळल्या असून त्यामध्ये 34 च्या सरासरीनं आणि 165 च्या स्ट्राईक रेटनं 1597 रन बनवले आहेत. त्याच्या नावावर 1 सेंच्युरी आणि 14 हाफ सेंच्युरी आहेत. आयपीएल 2026 मध्येही तो तुफान फॉर्ममध्ये आहे, त्यानं 14 मॅचमध्ये 486 रन ठोकले आहेत.
रजत पाटीदारचा आयपीएल प्रवास (मॅच आणि रन)
IPL 2021: 4 मॅच, 71 रन
IPL 2022: 8 मॅच, 333 रन
IPL 2024: 15 मॅच, 395 रन
IPL 2025: 15 मॅच, 312 रन
IPL 2026: 14 मॅच, 486 रन