New car number of Rohit Sharma: टीम इंडियाच्या वन-डे टीमचा कॅप्टन रोहित शर्माने नुकतीन नवीन अलिशान कार घेतली आहे. Lamborghini Urus SE असं या कारचं नाव आहे. लाल रंगाची ही कार नुकतीच रोहितला डिलिव्हर झाली. कारण रोहितला त्याची जुनी लॅम्बोर्गिनी उरुस एका Dream11 स्पर्धेतील विजेत्याला द्यावी लागली होती. रोहितच्या नवीन कारचा नंबर प्लेटवरुन फॅन्समध्ये चर्चा सुरु झाली आहे.
काय आहे नंबरचा अर्थ?
रोहितच्या नवीन कारचा नंबर प्लेट क्रमांक 3015 आहे, जो समजून घेण्यासाठी चाहत्यांना जास्त वेळ लागला नाही. रोहितने हा नंबर त्याच्या दोन मुलांच्या वाढदिवसाच्या तारखेनुसार ठेवला आहे. विशेष म्हणजे, या नंबर प्लेटमधील अंकांची बेरीज 45 आहे, जो त्याचा जर्सी क्रमांक आहे.
30 हा क्रमांक रोहितने त्याची मुलगी समायरासाठी ठेवला आहे, जिचा वाढदिवस 30 डिसेंबरला असतो, तर 15 हा क्रमांक त्याने मुलगा अहानसाठी ठेवला आहे, ज्याचा वाढदिवस 15 नोव्हेंबरला असतो. रोहितच्या जुन्या कारचा नंबर 264 होता, जो वनडे क्रिकेटमधील त्याच्या सर्वोच्च स्कोअरची आठवण होता.
( नक्की वाचा : Video : काळजी घे... रोहित शर्मानं केलं वचन पूर्ण, 4 कोटींची कार फॅन्सला दिली भेट! कारण काय? )
Lamborghini Urus SE ची किंमत किती आहे?
नवीन Urus SE ची किंमत एक्स-शोरूमनुसार सुमारे 4.57 कोटी रुपये आहे. या कारमध्ये 800 हॉर्सपॉवर आणि 950 एनएम टॉर्क आहे. ही कार फक्त 3.4 सेकंदात 0-100 किमी/तास वेग पकडते.
रोहित आणि विराटबाबत निर्णय कधी?
विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्या वन-डे क्रिकेटमधील भविष्याबाबत सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. पण, याबाबत बीसीसीआय कोणताही निर्णय घेण्याची घाई करणार नाही, अशी माहिती आहे. ऑगस्टमध्ये होणारा बांगलादेश दौरा रद्द झाल्याने, टीम इंडियाची पुढील वन-डे सीरिज 19-25 ऑक्टोबरदरम्यान ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणार आहे.
या सीरिजपूर्वी या दोघांना भारत 'अ' टीमकडून खेळण्यास सांगितले जाऊ शकते. ऑस्ट्रेलिया 'अ' टीम 30 सप्टेंबर ते 5 ऑक्टोबरच्या दरम्यान कानपूरमध्ये तीन सामने खेळणार आहे,
विराट आणि रोहितच्या नावावर वन-डे मॅचमध्ये मिळून 83 सेंच्युरी आणि 25,000 पेक्षा जास्त रन्स आहेत. ऑक्टोबर 2027 मध्ये होणाऱ्या वनडे वर्ल्ड कपवेळी रोहित 40 आणि विराट 39 वर्षांचा होईल. त्यामुळे ते तोपर्यंत खेळतील का? हा प्रश्न आहे.