Rohit Sharma Retirement News: भारतीय क्रिकेट वर्तुळात सध्या एकच खळबळ उडाली आहे. टी20 वर्ल्ड कप आणि चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकवून देणारा भारताचा सर्वात यशस्वी कॅप्टन रोहित शर्मा आता वन-डे क्रिकेटलाही रामराम ठोकणार असल्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. मैदानावर शांत आणि दिलखुलास दिसणारा हिटमॅन अचानक इतका मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत का आहे, याबद्दल आता एक अत्यंत धक्कादायक खुलासा समोर आला आहे.
टीम इंडियाचा मुख्य कोच गौतम गंभीर आणि मुख्य निवडकर्ता अजित आगरकर यांच्यासोबत वाढलेला दुरावा रोहित शर्माला चांगलाच भारी पडल्याचे बोलले जात आहे. या तिघांमधील अंतर्गत वाद आणि अविश्वासाचे वातावरण यामुळेच रोहितच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीचा शेवटचा अंक लिहिला जात असल्याचा दावा केला जात आहे.
सौरव गांगुली-ग्रेग चॅपल युगाची आठवण
रोहित शर्मा आणि गौतम गंभीर यांच्यातील हा वाद क्रिकेट चाहत्यांना जुन्या सौरव गांगुली आणि ग्रेग चॅपल वादाची आठवण करून देणारा ठरत आहे. आयपीएल 2024 दरम्यान वानखेडे स्टेडियमवर सराव सत्रानंतर रोहित गंभीरकडे गेला होता आणि त्याला म्हणाला होता, 'गौती भाई, इंडियन टीममध्ये ये.' त्यावर गंभीरने उत्तर दिले होते, 'तू कॅप्टन राहणार असशील तर नक्की येईन.'
त्यावेळी काही जवळच्या लोकांनी रोहितला सावधही केले होते की, राहुल द्रविड यांच्या शांत स्वभावाचा सराव झाल्यानंतर गंभीरसोबत काम करणे पूर्णपणे वेगळे आणि आव्हानात्मक असेल. पुढे घडलेही तसेच; द्रविड यांनी रोहित आणि आगरकर यांच्यात जो सुवर्णमध्य साधला होता, तो गंभीर आल्यानंतर पूर्णपणे कोलमडला.
( नक्की वाचा : ICC World Cup: ओळखा पाहू वर्ल्ड कपचे संपूर्ण स्वरुप कुणासाठी बदलले? आयसीसीच्या निर्णयामागचं खरं गुपित उघड )
आठवड्याभरात बिघडले समीकरण आणि सिडनी टेस्टपूर्वीचा तो वाद
न्यूझीलंडविरुद्ध घरच्या मैदानावर 0-3 असा पराभव झाल्यानंतर या नात्यातील दुरावा स्पष्ट दिसू लागली होती. ऑस्ट्रेलिया दौऱ्यादरम्यान सिडनी टेस्टच्या एक दिवस आधी रोहित शर्माने गंभीर आणि आगरकर यांच्याशी खूप वेळ चर्चा केली होती. रोहितला फॉर्ममध्ये नसल्यामुळे विश्रांती हवी होती, पण आगरकर यांना ते मान्य नव्हते. कारण रोहित बाहेर बसला तर इंग्लंड दौऱ्यासाठी त्याच्या निवडीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असते.
या वादाच्या दुसऱ्याच दिवशी रोहितने अचानक टेस्ट क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर करून गंभीर आणि आगरकर यांना मोठा धक्का दिला. त्या वेळी त्याने 'मी दोन मुलांचा बाप आहे आणि माझ्यासाठी काय योग्य आहे ते मला ठाऊक आहे,' असे तिखट उत्तरही दिले होते.
( नक्की वाचा : ICC World Cup : आयसीसी बदलणार वनडे आणि टी20 वर्ल्ड कपचा संपूर्ण फॉरमॅट, जाणून घ्या काय आहे नवा खेळ )
चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकूनही कॅप्टन्सी गेली
रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारताने चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली आणि दुबईत न्यूझीलंडविरुद्ध फायनलमध्ये त्याने महत्त्वाची इनिंगही खेळली. मात्र, इतके मोठे यश मिळवूनही रोहितला वन-डेच्या कप्तानीवरून हटवण्याचा विचार सुरू झाला, तेव्हा त्याचा विश्वास पूर्णपणे तुटला. निवड समितीला 2027 च्या वन-डे वर्ल्ड कपसाठी आतापासूनच यशस्वी जयस्वाल सारख्या तरुण खेळाडूंना जास्त संधी द्यायची आहे आणि या विचाराला गौतम गंभीरचाही पाठिंबा आहे. आगरकर यांनी जेव्हा रोहितला भविष्यातील या प्लॅनबद्दल सांगितले, तेव्हा त्यांच्यातील संवाद अतिशय कडू झाला.
असा होणार शेवट?
आपल्या संपूर्ण कारकिर्दीत 513 आंतरराष्ट्रीय मॅचेस खेळणाऱ्या, 20289 रन करणाऱ्या आणि तब्बल 50 सेंच्युरी ठोकणाऱ्या रोहित शर्माला स्वतःच्या मर्जीने निवृत्ती घेण्याचा पूर्ण अधिकार आहे. मात्र, निवड समिती आणि कोचसोबत असलेल्या तणावामुळे त्याला संघातून बाहेर ठेवण्याच्या बातम्या पसरवल्या गेल्या, ज्याचा फटका त्याच्या फलंदाजीवरही झाला.
काही रिपोर्ट्सनुसार, रोहितने आपल्या संभाव्य शेवटच्या मॅचसाठी पालकांना लंडनलाही बोलावले आहे. बीसीसीआय किंवा रोहितकडून अजून कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नसली, तरी रोहित, गंभीर आणि आगरकर यांच्यातील या त्रिकोणी लढाईत अजून बरेच ट्विस्ट येणे बाकी असल्याचे दिसत आहे.