टीम इंडियानं 2011 साली श्रीलंकेला पराभूत करत वन-डे वर्ल्ड कप जिंकला. तब्बल 28 वर्षांनंतर भारतीय टीमनं हा वर्ल्ड कप उंचावला. क्रिकेटमधील विश्वविजेता होण्याची सर्व भारतीयांची इच्छा त्या दिवशी पूर्ण झाली. ही इच्छा पूर्ण होण्यात कॅप्टन महेंद्रसिंह धोनीची (MS Dhoni) खेळी निर्णायक ठरली. धोनीनं वर्ल्ड कप फायनलमध्ये 79 बॉलमध्ये नाबाद 91 रन्स काढले होते. त्याच्या खेळीमुळे भारतानं 6 विकेट्सनं वर्ल्ड कप फायनल जिंकली होती.
सचिननं सांगितलं रहस्य
सर्वकालीन महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरने 2011 च्या ICC क्रिकेट वर्ल्ड कप फायनलमध्ये एमएस धोनीला फलंदाजीच्या क्रमवारीत वर पाठवण्यामागे काय कारण होते, याचा खुलासा केला आहे. सचिनने Reddit वरील 'Ask Me Anything' (AMA) सत्रादरम्यान ही माहिती दिली.
सत्रादरम्यान, एका युझरने सचिनला विचारले: "हाय सचिन. वीरूने सांगितले होते की CWC फायनलमध्ये युवराजच्या आधी एमएसडीला वर पाठवण्याची कल्पना तुझी होती. हे खरे आहे का आणि अशा धोरणात्मक बदलामागे काय कारण होते?"
सचिनने थेट उत्तर दिले नाही. त्याने सांगितले की, डावखुऱ्या आणि उजव्या हाताच्या फलंदाजांची जोडी असल्यामुळे श्रीलंकेचे दोन प्रमुख ऑफ-स्पिनर, मुथय्या मुरलीधरन आणि सूरज रणदिव यांना त्रास झाला असता. तसेच, 2008 ते 2010 या काळात चेन्नई सुपर किंग्स (CSK) मध्ये दोन्ही खेळाडू एकत्र खेळल्यामुळे धोनीला मुरलीधरनचा सामना करण्याचा अनुभव होता, हेही त्याने सांगितले.
( नक्की वाचा : Rahul Dravid : सचिन तेंडुलकरचा 'तो' सल्ला ऐकल्याचा पश्चाताप, राहुल द्रविडनं बोलून दाखवली खंत )
"धोनीला वर पाठवण्याच्या माझ्या कल्पनेमागे 2 कारणे होती. डाव्या-उजव्या फलंदाजांच्या कॉम्बिनेशनमुळे दोन ऑफ-स्पिनर्सना त्रास झाला असता आणि मुरलीधरनने CSK साठी (2008-2010 पर्यंत) खेळले होते. एमएसने त्याच्यासोबत 3 हंगामात नेटमध्ये सराव केला होता," असे सचिनने त्याच्या AMA सत्रात सांगितले.
सचिनचे हे डावपेज कमालीचे यशस्वी ठरले. भारताने तब्बल 28 वर्षानंतर वर्ल्ड कप जिंकला. आपला शेवटचा 50-ओव्हरचा विश्वचषक खेळणाऱ्या या महान खेळाडूचे सहाव्या प्रयत्नात विजेचेपद मिळवण्याचे स्वप्न पूर्ण झाले. सचिननं त्या वर्ल्ड कपमधील नऊ सामन्यांमध्ये 53.55 च्या सरासरीने 482 रन्स केले होते. ज्यात दोन सेंच्युरी आणि दोन हाफ सेंच्युरीचा समावेश होता. सचिननं भारताकडून त्या स्पर्धेत सर्वात जास्त रन्स केले होते. तर एकूण यादीत तो दुसऱ्या क्रमांकावर होता.