Sanju Samson News : कोलकातामधील ईडन गार्डन्सवर पार पडलेल्या टी20 वर्ल्ड कपमधील सुपर-8 च्या अटीतटीच्या सामन्यात संजू सॅमसनने त्याच्या बॅटने टीकाकारांची बोलती बंद केली. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पराभवानंतर दबावात असलेल्या भारतीय संघाला सावरण्यासाठी संजूला सलामीला संधी दिली गेली आणि त्याने या संधीचे सोने केले.
संजूने अवघ्या 50 बॉलमध्ये 97 रनची वादळी खेळी करत 196 रनचे कठीण लक्ष्य गाठून दिले. या खेळीत त्याने 12 फोर आणि 4 उत्तुंग सिक्सर्स लगावले. या विजयानंतर संजूने आपल्या खराब फॉर्ममधून बाहेर पडण्यासाठी काय प्रयत्न केले, याचा खुलासा केला आहे.
फोन आणि सोशल मीडिया बंद
खराब फॉर्ममुळे संजू सॅमसनवर प्रचंड टीका होत होती. अशा वेळी स्वतःचे मानसिक संतुलन राखण्यासाठी त्याने एक कठोर निर्णय घेतला. संजूने सांगितले की, त्याने आपला फोन आणि सोशल मीडिया अकाउंट पूर्णपणे बंद करून टाकले होते. बाहेर काय चर्चा सुरू आहे, याकडे लक्ष देण्याऐवजी त्याने स्वतःवर विश्वास ठेवला.
संजूनं सांगितलं की, मी माझ्या सेटअपमध्ये जास्त बदल केले नाहीत, कारण याच पद्धतीने मी आधी परफॉर्म केले होते. सोशल मीडियापासून दूर राहिल्यामुळे त्याला स्वतःच्या खेळावर लक्ष केंद्रित करणे सोपे झाले आणि एका मोठ्या सामन्यात त्याला ही खेळी करता आली.
( नक्की वाचा : Ranji Trophy : अपमान सोसला, आरोप झेलले पण हार मानली नाही; अजय शर्माच्या एका जिद्दीने जम्मू काश्मीर चॅम्पियन )
संजूची एकाकी झुंज
वेस्ट इंडिजविरुद्धच्या या सामन्यात भारताची सुरुवात काहीशी अडखळत झाली होती. कॅप्टन सूर्यकुमार यादव 18 रन आणि तिलक वर्मा 27 रन करून बाद झाले. नियमित अंतराने विकेट्स पडत असल्यामुळे 196 रनचा पाठलाग करणे आव्हानात्मक बनले होते. अशा परिस्थितीत संजूने एका बाजूने किल्ला लढवला. त्याने मान्य केले की, दव पडल्यामुळे पाठलाग सोपा होईल असे वाटले होते, पण विकेट्स गेल्यामुळे सामना शेवटपर्यंत नेणे गरजेचे होते. त्याच्या अनुभवाचा वापर करून त्याने रिस्क घेण्याऐवजी बाऊंड्री मारण्यावर भर दिला आणि टीमला विजय मिळवून दिला.
अपयशाच्या काळात सकारात्मकतेचा मंत्र
न्यूझीलंडविरुद्धच्या घरच्या सीरिजमध्ये संजूला चांगली कामगिरी करता आली नव्हती. त्या काळात मनात अनेक नकारात्मक विचार येत असल्याचे त्याने कबूल केले. "मी हे करू शकेन का?" असा प्रश्न त्याला सतावत होता. पण त्यानंतर मिळालेल्या 10 दिवसांच्या गॅपमध्ये त्याने स्वतःच्या गेमवर काम केले. अनेकांनी त्याला सल्ले दिले, पण त्याने आपल्या मूळ तंत्रावर (Base) विश्वास ठेवला.
संजूने स्वतःला आठवण करून दिली की, याच सेटअपच्या जोरावर त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये तीन सेंच्युरी मारल्या आहेत. या सकारात्मक विचारानेच त्याला पुनरागमन करण्यास मदत केली.
संजू झाला भावूक
कोलकाता येथील या ऐतिहासिक खेळीबद्दल बोलताना संजू भावूक झाला होता. तो म्हणाला की, भारतातील करोडो क्रिकेटर्स अशा दिवसाचे स्वप्न पाहतात आणि तो स्वतःला नशीबवान समजतो की त्याला हे स्वप्न जगता आले. केरळमधील त्रिवेंद्रममधून आलेल्या एका तरुणाने देशासाठी खेळण्याचे आणि देशाला महत्त्वाच्या सामन्यात विजय मिळवून देण्याचे स्वप्न पाहिले होते, जे आज सत्यात उतरले आहे. दबावाच्या स्थितीत संयम राखून खेळल्यामुळेच संजू आज टीम इंडियाचा मॅच विनर ठरला आहे.