T20 World Cup 2026, ICC Replaces Bangladesh with Scotland: टी20 वर्ल्ड कपच्या मैदानातून मोठी बातमी समोर येत आहे. भारत आणि श्रीलंका या देशांमध्ये येत्या 7 फेब्रुवारीपासून रंगणाऱ्या टी20 वर्ल्ड कप 2026 मधून बांगलादेशचा पत्ता कट झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून भारतामध्ये खेळण्याबाबत बांगलादेश क्रिकेट बोर्डाने नकार दिला होता. या वादावर आता आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद म्हणजेच आयसीसीने मोठा निर्णय घेतला असून बांगलादेशच्या जागी स्कॉटलंडला या मेगा इव्हेंटमध्ये प्रवेश दिला आहे. शनिवारी 24 जानेवारी रोजी आयसीसीने या निर्णयावर अधिकृत शिक्कामोर्तब केल्यामुळे आता वर्ल्ड कपच्या समीकरणात मोठा बदल झाला आहे.
आयसीसीने घेतला कठोर निर्णय
आयसीसीने बांगलादेश क्रिकेट बोर्डाला त्यांचे म्हणणे मांडण्यासाठी आणि निर्णयाचा पुनर्विचार करण्यासाठी 24 तासांचा अल्टिमेटम दिला होता. मात्र बांगलादेशने आपल्या भूमिकेत कोणताही बदल केला नाही. उलट शुक्रवारी झालेल्या प्रेस कॉन्फरन्समध्ये बांगलादेशने वापरलेली भाषा आयसीसीला रुचली नाही.
आयसीसीचे सीईओ संजोग गुप्ता यांनी बोर्डाला लिहिलेल्या पत्रात स्पष्ट केले की, बांगलादेशच्या मागण्या आयसीसीच्या धोरणांना धरून नाहीत. बांगलादेशने आयसीसीच्या नियमांचे पालन करण्यास नकार दिल्यामुळे आता त्यांच्या जागी दुसऱ्या देशाला निमंत्रण देण्याशिवाय कोणताही पर्याय उरला नव्हता. या संदर्भातील पत्राची प्रत बांगलादेश क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष अमीनुल इस्लाम यांनाही धाडण्यात आली आहे.
( नक्की वाचा : Vaishnavi Sharma : ज्योतिषाचा सल्ला अन् वैष्णवी थेट टीम इंडियात; वाचा नव्या National Crush ची गोष्ट )
स्कॉटलंडचा समावेश का?
बांगलादेश बाहेर पडल्यानंतर आता स्कॉटलंडचा संघ या वर्ल्ड कपमध्ये मैदानात उतरणार आहे. आयसीसीने त्यांच्या रँकिंगच्या आधारावर हा निर्णय घेतला आहे. स्कॉटलंडचा संघ सध्या रँकिंगमध्ये 14 व्या स्थानावर आहे आणि त्यांचे अलीकडच्या काळातील प्रदर्शन कौतुकास्पद राहिले आहे. 2024 च्या टी20 वर्ल्ड कपमध्ये त्यांनी चांगली झुंज दिली होती.
त्या स्पर्धेत स्कॉटलंडचे पॉईंट्स इंग्लंडच्या बरोबरीने होते, पण रन रेट कमी असल्याने ते पुढे जाऊ शकले नव्हते. यापूर्वी 2022 मध्ये त्यांनी वेस्ट इंडिजसारख्या मोठ्या टीमला हरवून सगळ्यांना चकित केले होते. त्यामुळे स्कॉटलंडला ही संधी रँकिंग आणि त्यांच्या कामगिरीमुळेच मिळाली आहे.
आयसीसीने दिला होता पुरेसा वेळ
संजोग गुप्ता आणि आयसीसीच्या टीमने बांगलादेशला त्यांचे मत बदलण्यासाठी बराच वेळ दिला होता. आयसीसीला असे वाटत नव्हते की बांगलादेशसारखा संघ क्रिकेटच्या या मोठ्या मंचापासून दूर राहावा. मात्र कोणताही देश वर्ल्ड कपचे ठिकाण बदलण्याची मागणी करू शकत नाही, असे आयसीसीने स्पष्ट केले.
स्पर्धेच्या वेळापत्रकाची शिस्त आणि मान राखण्यासाठी आयसीसीने हा कठोर निर्णय घेणे पसंत केले. अखेर शनिवारी सकाळी दुबई आणि स्कॉटलंड क्रिकेट बोर्डाची चर्चा झाली आणि स्कॉटलंडने वर्ल्ड कपमधील बांगलादेशची जागा अधिकृतपणे घेतली.