IND vs WI T20 World Cup 2026: टी-20 वर्ल्ड कपमध्ये रविवारचा दिवस (1 मार्च 2026) टीम इंडियासाठी सर्वात महत्त्वाचा दिवस आहे. गतविजेत्या भारताला सेमी फायनल गाठण्यासाठी कोलकातामध्ये होणारी वेस्ट इंडिज विरुद्धची लढत कोणत्याही परिस्थितीत जिंकावी लागेल. ही 'करो या मरो'ची लढाई जिंकण्यासाठी टीम इंडिया आता आपल्या भात्यातील सर्वात मोठं शस्त्र उपसणार आहे. वेस्ट इंडिजच्या आक्रमक बॅटर्सना रोखण्यासाठी मिस्ट्री स्पिनर कुलदीप यादवला मैदानात उतरवण्याची दाट शक्यता आहे.
विंडिजला नडणार कुलदीपची गुगली
वेस्ट इंडिजची टीम त्यांच्या तुफानी बॅटिंगसाठी ओळखली जाते. त्यांना रोखण्यासाठी फक्त रन्स वाचवून चालणार नाही, तर त्यांचे बळी घेणं गरजेचं आहे. कुलदीप यादव हा असा बॉलर आहे ज्याची गुगली आणि मिस्ट्री समजून घेणं विंडिजच्या खेळाडूंना नेहमीच जड गेलंय. या स्पर्धेत तो आतापर्यंत फक्त 1 च मॅच खेळलाय, पण उद्याच्या निर्णायक सामन्यात तो भारतासाठी गेम चेंजर ठरू शकतो.
वरुण चक्रवर्तीचा खराब फॉर्म
गेल्या दोन सामन्यांमध्ये वरुण चक्रवर्ती आपली जादू दाखवण्यात अपयशी ठरला आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध त्याने 4 ओव्हर्समध्ये 47 रन्स दिले, तर झिम्बाब्वेविरुद्धही त्याने 35 रन्स खर्च केले. वरुणला आपल्या लेंथवर नियंत्रण मिळवता येत नसल्याने भारताचं नुकसान होत आहे. अशा वेळी कोलकाताच्या ईडन गार्डन्सवर खेळण्याचा दांडगा अनुभव असलेला कुलदीप यादव हा भारतासाठी सर्वोत्तम पर्याय ठरेल.
( नक्की वाचा : Ranji Trophy : अपमान सोसला, आरोप झेलले पण हार मानली नाही; अजय शर्माच्या एका जिद्दीने जम्मू काश्मीर चॅम्पियन )
कुलदीपचा वेस्ट इंडिजविरुद्धचा रेकॉर्ड
विंडिजविरुद्ध कुलदीपची आकडेवारी पाहिल्यास प्रतिस्पर्धी टीमचं टेन्शन नक्कीच वाढेल. त्याने टेस्ट क्रिकेटमध्ये 4 मॅचमध्ये 22 विकेट्स घेतल्या आहेत. वन-डेमध्ये 19 मॅच खेळताना त्याने 33 विकेट्स काढल्या असून 2019 मध्ये त्याने विशाखापट्टणममध्ये विंडीजविरुद्ध हॅट्ट्रिक घेत फक्त 6 रन्स देऊन 4 विकेट्स घेण्याचा कारनामा केला होता. टी-20 मध्येही त्याने 9 मॅचमध्ये 17 विकेट्स घेत आपली ताकद सिद्ध केली आहे.
मोठे बदल होणार?
वेस्ट इंडिजचे 10 बळी घेण्यासाठी भारताला विकेट टेकर बॉलरची गरज आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारताने चांगली सुरुवात केली होती, पण मिडल ओव्हर्समध्ये विकेट्स न मिळाल्याने पराभव पत्करावा लागला. ही चूक टाळण्यासाठी कुलदीपला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान देण्यासाठी कदाचित संजू सॅमसन किंवा शिवम दुबेला बेंचवर बसावे लागू शकते. कोलकाताच्या खेळपट्टीवर कुलदीपची स्पिन बॉलिंग इंडियाला सेमी फायनलचं तिकीट मिळवून देऊ शकते.