Why Pakistan Can't Afford to Boycott T20 WC 2026: भारत आणि श्रीलंका या दोन देशांमध्ये होणाऱ्या T20 वर्ल्ड कपचं काऊंट डाऊन सुरु झालं आहे. या स्पर्धेबाबत ताठर भूमिका घेणाऱ्या बांगलादेशची आयसीसीनं हकालपट्टी केली आहे. आता बांगलादेशला पाठिंबा देण्यासाठी स्पर्धेबाबत पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (PCB) बहिष्कार टाकणार असल्याची चर्चा सुरु झाली आहे.
बांगलादेशच्या समर्थनार्थ पाकिस्तान हे पाऊल उचलणार असल्याचे बोलले जात असले, तरी वास्तवात असे करणे पाकिस्तानसाठी अशक्य मानले जात आहे. पीसीबीचे प्रमुख मोहसिन नकवी यांनी स्पष्ट केले आहे की, वर्ल्ड कपमध्ये सहभागी व्हायचे की नाही याचा अंतिम निर्णय तेथील सरकार घेईल. जरी पाकिस्तानने आपली टीम जाहीर केली असली, तरी सरकारी परवानगी अद्याप मिळालेली नाही. परंतु, काही ठोस कारणांमुळे पाकिस्तानला या स्पर्धेतून माघार घेणे परवडणारे नाही. ही कारणं कोणती ते पाहूया
कायदेशीर अडचणी आणि आयसीसीचा करार
आंतरराष्ट्रीय क्रिकेट कौन्सिलच्या (आयसीसी) प्रत्येक मोठ्या स्पर्धेपूर्वी सर्व सदस्य देशांना एका विशिष्ट करारावर स्वाक्षरी करावी लागते. याला टूर्नामेंट पार्टिसिपेशन एग्रीमेंट (टीपीए) असे म्हणतात. हा केवळ एक कागद नसून तो कायदेशीररित्या बंधनकारक असलेला करार असतो.
पाकिस्तानने ऐनवेळी स्पर्धेतून माघार घेतली, तर तो थेट कराराचा भंग मानला जाईल. अशा परिस्थितीत आयसीसी पाकिस्तानचा वार्षिक महसूल हिस्सा रोखू शकते. हा महसूल साधारणपणे 34 ते 35 मिलियन डॉलर इतका मोठा असतो. आधीच आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या पीसीबीसाठी हा खूप मोठा आर्थिक फटका ठरू शकतो.
( नक्की वाचा : T20 World Cup 2026: बांगलादेशला मस्ती नडली! ICC नं केली वर्ल्ड कपमधून हकालपट्टी, स्कॉटलंडचा झाला समावेश )
राजकीय हस्तक्षेप आणि निलंबनाचा धोका
जर पाकिस्तानने वर्ल्ड कपमधून माघार घेण्याचा निर्णय सरकारी दबावाखाली घेतला आहे असे सिद्ध झाले, तर आयसीसी याकडे राजकीय हस्तक्षेप म्हणून बघेल. आयसीसीच्या नियमांनुसार क्रिकेटमध्ये सरकारचा हस्तक्षेप खपवून घेतला जात नाही.
यापूर्वी झिम्बाब्वे आणि श्रीलंका या देशांनी अशाच प्रकारच्या हस्तक्षेपामुळे निलंबनाची कारवाई सोसली आहे. पाकिस्तानवर अशी कारवाई झाली, तर त्यांना केवळ वर्ल्ड कपच नाही तर भविष्यातील आशिया कप आणि इतर आयसीसी स्पर्धांमधूनही बाहेर व्हावे लागेल. तसेच 2028 च्या महिला टी२० वर्ल्ड कपसारख्या स्पर्धांच्या यजमानपदावरही त्यांना पाणी सोडावे लागेल.
( नक्की वाचा : Vaishnavi Sharma : ज्योतिषाचा सल्ला अन् वैष्णवी थेट टीम इंडियात; वाचा नव्या National Crush ची गोष्ट )
पीएसएलच्या अस्तित्वावर येणार गदा
पाकिस्तान सुपर लीग (पीएसएल) ही पाकिस्तानच्या क्रिकेटची मोठी ओळख आहे. या लीगचे यश प्रामुख्याने परदेशी खेळाडूंवर अवलंबून असते. जर पाकिस्तानने आयसीसीच्या स्पर्धेवर बहिष्कार टाकला, तर इंग्लंड, ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेसारखे क्रिकेट बोर्ड आपल्या खेळाडूंना पाकिस्तानमध्ये खेळण्यासाठी ना हरकत प्रमाणपत्र (एनओसी) देण्यास नकार देऊ शकतात.
परदेशी खेळाडू नसतील तर पीएसलची ब्रँड व्हॅल्यू, ब्रॉडकास्टिंग हक्क आणि प्रायोजकत्व या सर्वांना मोठा फटका बसेल. यामुळे पाकिस्तानच्या देशांतर्गत क्रिकेटचा सर्वात मजबूत खांब कोसळू शकतो.
द्विपक्षीय मालिका आणि आंतरराष्ट्रीय एकाकीपण
क्रिकेटमध्ये केवळ मोठ्या स्पर्धा महत्त्वाच्या नसून दोन देशांमधील द्विपक्षीय मालिकाही तितक्याच महत्त्वाच्या असतात. पाकिस्तानने वर्ल्ड कपमध्ये गोंधळ निर्माण केला, तर जगातील इतर शक्तिशाली क्रिकेट बोर्ड त्यांच्याशी संबंध तोडू शकतात.
बड्या देशांच्या टीम पाकिस्तानचा दौरा करणे बंद करतील, ज्यामुळे पीसीबीची कमाई पूर्णपणे थांबेल. बांगलादेशशी मैत्री निभावणे ही नैतिक गोष्ट असली, तरी टी20 वर्ल्ड कप 2026 चा बहिष्कार करणे म्हणजे पाकिस्तानने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घेण्यासारखे ठरेल.