Rohit Sharma Will Out From Sydney Test IND vs AUS: भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात होणारी सिडनी टेस्ट टीम इंडियासाठी प्रतिष्ठा वाचवण्याची शेवटची संधी आहे. पाच टेस्टच्या या सीरिजमध्ये भारतीय टीम सध्या 1-2 नं पिछाडीवर आहे. आता बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी आपल्याकडंच राखायची असेल तर भारतीय टीमला सिडनी टेस्ट कोणत्याही परिस्थितीमध्ये जिंकावी लागेल.
सिडनी टेस्ट सुरु होण्यास काही तास बाकी असतानाच टीम इंडियाच्या कॅम्पमधून एक मोठी बातमी येत आहे. सिडनी टेस्टमधील प्लेईंग 11 मध्ये रोहित शर्माचा समावेश होणार नाही. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार रोहितला विश्रांती दिली जाईल. तर जसप्रीत बुमराह भारतीय टीमचं नेतृत्त्व करेल. यापूर्वी या सीरिजमधीर पर्थ टेस्टमध्ये रोहितच्या अनुपस्थितीमध्ये बुमराहनं टीमचं नेतृत्त्व केलं होतं.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
यापूर्वी, बुधवारी (2 जानेवारी) पत्रकार परिषदेमध्ये रोहित शर्मावरील प्रश्नावर गंभीरनं दिलेलं उत्तर चांगलंच चर्चेत आहे. रोहित शर्मा सिडनी टेस्ट खेळणार का? या प्रश्नावर गंभीरनं पिचचा विचार करुन निर्णय घेणार असल्याचं गंभीरनं सांगितलं होतं.
रोहित शर्मा आणि विराट कोहलीशी टेस्ट मॅच जिंकण्याच्या रणनितीशिवाय कोणतीही चर्चा झालेली नाही. प्रत्येकालाच त्याला काय काम करायचं आहे, हे माहिती आहे. मी त्यांच्याशी फक्त ही टेस्ट कशी जिंकता येईल यावर चर्चा केली आहे, असं गंभीरनं स्पष्ट केलं.
( नक्की वाचा : Gautam Gambhir : 'भारतीय क्रिकेट तोपर्यंतच सुरक्षित... ड्रेसिंग रुमच्या प्रश्नावर गंभीरनं सुनावलं )
रोहित शर्मा सपशेल फेल
रोहित शर्मा या सीरिजमध्ये सपशेल फेल ठरला आहे. त्यानं आत्तापर्यंत या सीरिजमध्ये फक्त 31 रन केले आहेत. रोहित पर्थमध्ये झालेली पहिली टेस्ट कौटुंबीक कारणामुळे खेळला नव्हता. पण, त्यानंतरच्या तीन्ही टेस्टमध्ये तो अपयशी ठरलाय. त्याला एकाही इनिंगमध्ये मोठा स्कोअर करता आलेला नाही.
रोहितनं पाच इनिंगमध्ये 3, 6, 10, 3 आणि 9 रन केले आहेत. त्याची या सीरिजमधील सरासरी 6.20 आहे. ऑस्ट्रेलियामध्ये कोणत्याही विदेशी कॅप्टनची ही सर्वात कमी सरासरी आहे. रोहित सप्टेबंर महिन्यापासूनच सातत्यानं टेस्ट क्रिकेटमध्ये फेल होत आहे. त्यानं या कालावधीमध्ये फक्त 164 रन केले आहेत. त्याची सरासरी 10 पेक्षा थोडी जास्त आहे.
गावस्करांनी केली भविष्यवाणी
महान क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांनी 'स्पोर्ट्स तक' शी बोलताना रोहितच्या निवृत्तीबाबत मोठी भविष्यवाणी केली आहे. रोहितचा सध्याचा फॉर्म पाहता तो सिडनी टेस्टनंतर टेस्ट क्रिकेटला अलविदा करु शकतो. आता टीम मॅनेजमेंटलाही वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची (WTC 2027) तयारी सुरु करायला हवी.'