आयसीसीची वर्षातील मोठी स्पर्धा तीन महिन्यांवर आली असतानाही ती कुठं होणार हे निश्चित नसल्याची घटना क्रिकेट विश्वात पहिल्यांदाच घडली आहे. आयसीसीनं चॅम्पियन्स ट्रॉफीचं यजमानपद पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला (PCB) दिलंय. ही स्पर्धा आता तीन महिन्यांवर आलीय. पण अजूनही ही स्पर्धा पाकिस्तानात पूर्णवेळ होणार की नाही, हे स्पष्ट नाही. भारतीय क्रिकेट टीम सुरक्षेच्या कारणामुळे पाकिस्तानमध्ये जाणार नाही हे भारतीय क्रिकेट बोर्ड (BCCI) नं यापूर्वीच स्पष्ट केलंय. त्यानंतर या विषयावर परराष्ट्र मंत्रालयानंही उत्तर दिलंय.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
परराष्ट्र मंत्रालयाचे रणधीर जायसवाल (Randhir Jaiswal) यांनी या विषयावर शुक्रवारी (29 नोव्हेंबर) पत्रकारांना माहिती दिली. जायसवाल यांनी भारतीय क्रिकेट टीम पाकिस्तानमध्ये जाणार का? या विषयावर सांगितलं की, बीसीसीआयनं याबाबत एकत्र वक्तव्य प्रसिद्ध केलं आहे. त्यांनी सांगितलं की, तिथं सुरक्षेचा प्रश्न आहे. त्यामुळे टीम जाण्याची शक्यता नाही.' असं जासवाल यांनी स्पष्ट केलंय. जायसवाल यांच्या स्पष्टीकरणामुळे बीसीसीआयपाठोपाठ भारत सरकारनंही परवानगी नाकारल्याचं स्पष्ट झालं आहे.
बीसीसीआयनं दोन्ही देशांतील तणावपूर्व संबंधामुळे खेळाडूंच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न असल्याचं सांगत क्रिकेट टीम पाकिस्तानमध्ये जाणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे. या प्रश्नावर आंतरराष्ट्रीय क्रिकेट कौन्सिलची (ICC) नुकतीच एक व्हर्च्युअल बैठक झाली. त्यामध्ये ही स्पर्धा हायब्रीड मॉडेलनुसार खेळवण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला.
( ट्रेंडिंग बातमी : ऑस्ट्रेलियन PM च्या प्रश्नावर विराट कोहलीचा सिक्सर, Video Viral )
या प्रस्तावानुसार चॅम्पियन्स ट्रॉफीतील भारताचे सर्व सामने तसंच सेमी फायनल आणि फायनल पाकिस्तानच्या बाहेर खेळवण्यात यावे. तर उर्वरित सर्व सामने पाकिस्तानात खेळवण्याचा प्रस्ताव आहे. यापूर्वी 2023 मधील आशिया कप स्पर्धा या पद्धतीनं झाली होती. त्यावेळी भारताचे सर्व सामने तसंच सेमी फायनल आणि फायनल श्रीलंकेत खेळवण्यात आले होते. पण, चॅम्पियन्स ट्रॉफीतील सर्व सामने पाकिस्तानमध्ये खेळवण्यावर पीसीबी ठाम आहे. त्यामुळे हा पेच अद्याप सुटलेला नाही.