Rafael Nadal has announced his retirement : ऑल टाईम ग्रेट टेनिसपटू राफेल नदालनं निवृत्तीची घोषणा केली आहे. डेव्हिस कप स्पर्धेतील नोव्हेंबर महिन्यात तो कारकिर्दीमधील अखेरची स्पर्धा खेळणार आहे. नदालनं गुरुवारी सोशल मीडियावर पोस्ट करुन याची माहिती फॅन्सना दिली आहे.
टेनिस इतिहासातील सर्वकालीन महान खेळाडूंमध्ये राफेल नदालचा समावेश होता. तो गेल्या काही वर्षांपासून दुखापतींनं त्रस्त होता. 38 वर्षांच्या नदालनं तब्बल 22 ग्रँड स्लॅम स्पर्धा जिंकल्या आहेत. पुरुष एकेरीमध्ये नदालपेक्षा फक्त नोव्हाक जोकोविचनं जास्त ग्रँड स्लॅम जिंकले आहेत. जोकोविचच्या नावावर 24 विजेतेपद आहेत.
लाल मातीचा सम्राट
राफेल नदलनं सर्वात जास्त 14 वेळा फ्रेंच ओपन स्पर्धा जिंकली आहे. या प्रकारची कामगिरी कोणत्याही टेनिसपटूला आजवर जमलेली नाही. या रेकॉर्डमुळेच नदालची लाल मातीचा सम्राट अशी ओळख आहे. फ्रेंच ओपन स्पर्धा ही लाल मातीमध्ये खेळली जाते. अनेक दिग्गज टेनिसपटूंसाठी ही स्पर्धा जिंकणं मोठं आव्हान आहे. पण, नदालं या स्पर्धेवर अक्षरश: एकछत्री अंमल केला होता.
( नक्की वाचा : रोहित शर्मा कधी रिटायर होणार? कोचनं केला मोठा गौप्यस्फोट )
नदालनं 14 फ्रेंच ओपनसह 4 वेळा अमेरिकन ओपन, 2 वेळा विम्बलडन आणि 2 वेळा ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धा जिंकली आहे. रॉजर फेडरर-राफेल नदाल आणि नोव्हाक जोकोविच या त्रिकुटाची एकेकाळी टेनिसविश्वार सत्ता होती. सर्वकालीन महान टेनिसपटूंमध्ये त्यांचा समावेश होता. त्यामधील सर्वात सिनिअर असलेला रॉजर फेडरर यापूर्वीच निवृत्त झाला आहे. त्यानंतर नदालनं निवृत्तीची घोषणा करत टेनिस फॅन्सना मोठा धक्का दिला आहे.