पॅरिस ऑलिम्पिकमधून नुकतीच परतलेली भारताची कुस्तीपटू विनेश फोगाटनं दिल्ली पोलिसांवर गंभीर आरोप केले आहेत. ज्या महिला कुस्तीपटूंची ब्रुजभूषण सिंह यांच्या विरोधात साक्ष होणार आहे त्यांची सुरक्षा हटवण्यात आलीय, असा आरोप विनेशनं केलाय.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
विनेशनं सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर X वर ट्विट करत हा आरोप केलाय. ब्रुजभूषण सिंह हे भारतीय कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष आहेत. विनेशसह ऑलिम्पिक पदक विजेती कुस्तीपटू साक्षी मलिकसह काही कुस्तीपटूंनी ब्रुजभूषण यांच्यावर लैंगिक शोषण केल्याचा आरोप केला होता. त्यांनी या प्रकरणात दिल्लीतील जंतर-मंतर इथं निदर्शनंही केली.
कुस्तीपटूंच्या आंदोलनानंतर ब्रुजभूषण सिंह यांना अध्यक्षपदावरुन दूर करण्यात आलं. तसंच लोकसभा निवडणुकीती भाजपानं त्यांना तिकीट नाकारलं होतं. दिल्लीतील एका कोर्टानं त्यांच्यावर कुस्तीपटूंच्या लैंगिक शोषणाच्या प्रकारात आरोप निश्चित केले आहेत. त्यानंतर विनेशनं हा गंभीर आरोप केलाय.
विनेश फोगाट नुकतीच पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत सहभागी झाली होती. ऑलिम्पिक स्पर्धेची फायनल गाठणारी विनेश भारताची पहिली महिला कुस्तीपटू होती. पण फायनलपूर्वी तिचं वजन 100 ग्रॅम जास्त भरलं. त्यामुळे तिला अपात्र ठरवण्यात आलं. विनेशच्या अपत्राततेविरोधात भारतानं आंतरराष्ट्रीय क्रीडा लवादाकडं दादही मागितली होती. पण, भारताचं अपिल लवादानं फेटाळलं. त्यामुळे विनेशला पदकाविना मायदेशी परतावं लागलं.
पॅरिसमध्ये पदक मिळालं नसलं तरी विनेशचं दिल्ली तसंच तिचं राज्य असलेल्या हरयाणामध्ये जोरदार स्वागत झालं. पॅरिस ऑलिम्पिकनंतर तिची ब्रँड व्हॅल्यू देखील वाढली आहे.
( नक्की वाचा : मेडल हुकलं, पण भाव वाढला! विनेश फोगाटला करारबद्ध करण्यासाठी चढाओढ, इतक्या पटीनं वाढली फीस )
दिल्ली पोलिसांचं स्पष्टीकरण
दिल्ली पोलिसांनी विनेशचा आरोप फेटाळून लावला आहे. कुणाचीही सुरक्षा काढण्याचे आदेश देण्यात आलेले नाहीत. एखाद्या ठिकाणी सुरक्षा कर्मचारी पोहोचण्यात उशीर झाला असेल तर त्या प्रकरणाची चौकशी करण्यात येईल, असं दिल्ली पोलिसांनी सांगितल्यांची माहिती दिली आहे.