Online Gaming Bill 2025: तुम्हीही ऑनलाईन गेममध्ये पैसे लावत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे! क्रिकेट मॅच असो किंवा इतर कोणतेही गेम, ऑनलाईन पैसे लावून खेळण्याचं वेड गेल्या काही वर्षांत प्रचंड वाढलं होतं. पण आता यावर सरकारने मोठी कारवाई केली आहे.
नुकत्याच संसदेत मंजूर झालेल्या 'ऑनलाईन गेमिंग बिल 2025' नुसार, पैसे लावून खेळले जाणारे सर्व ऑनलाईन गेम्स आता बेकायदेशीर ठरवण्यात आले आहेत. यामुळे मोठमोठ्या गेमिंग कंपन्यांना त्यांचे 'रियल मनी' गेम्स बंद करावे लागले आहेत.
कोणत्या कंपन्यांवर झाला परिणाम?
या नवीन कायद्यामुळे Dream11, MPL, Gameskraft, Zupee, आणि Probo यांसारख्या भारतातील सर्वात मोठ्या गेमिंग कंपन्यांना त्यांचे 'रियल मनी' ऑपरेशन्स थांबवावे लागले आहेत.
तुमच्या खात्यातील पैशांचं काय?
तुमचीही यापैकी कोणत्याही गेममध्ये पैसे जमा असतील, तर काळजी करू नका. या कंपन्यांनी युजर्सच्या पैशांच्या सुरक्षिततेची खात्री दिली आहे.
Dream11: कंपनीने त्यांचे 'ड्रीम पिक्स' (Dream Picks) आणि 'ड्रीम प्ले' (Dream Play) ॲप्समधील सर्व स्पर्धा थांबवल्या आहेत. तुमच्या खात्यातील पैसे सुरक्षित असून तुम्ही ते Dream11 ॲपमधून कधीही काढू शकता.
MPL: या कंपनीनेही सर्व पैशांचे गेम्स बंद केले आहेत. ज्यांच्या खात्यात पैसे शिल्लक आहेत, ते ते सहजपणे काढू शकतात. आता MPL फक्त मोफत गेम्सवर लक्ष केंद्रित करणार आहे.
Gameskraft: त्यांच्या RummyCulture सारख्या ॲप्सवरील 'अॅड कॅश' आणि 'गेमप्ले' सेवा थांबवण्यात आल्या आहेत. कंपनीने स्पष्ट केले आहे की, युजर्सचे पैसे पूर्णपणे सुरक्षित आहेत आणि ते कधीही काढता येतील.
Zupee: 21 ऑगस्टपासून झुपीने त्यांचे 'पेड गेम्स' बंद केले आहेत. मात्र, Ludo Supreme सारखे त्यांचे मोफत गेम्स पूर्वीप्रमाणेच सुरू राहणार आहेत.
Probo: या कंपनीनेही लगेचच त्यांचे 'रियल मनी' गेम्स बंद केले आहेत आणि सरकारच्या निर्णयाचा आदर करत असल्याचे सांगितले आहे.
( नक्की वाचा : KBC मध्ये 1 कोटी जिंकल्यावर खात्यात किती पैसे येतात? फार कमी लोकांना माहीत आहे उत्तर )
नवीन कायद्याचे नियम काय आहेत?
नवीन कायद्यानुसार, जो कोणी पैसे लावून गेम खेळेल किंवा असे गेम चालवेल, त्याला 3 वर्षांपर्यंतचा तुरुंगवास किंवा 1 कोटी रुपयांपर्यंतचा दंड होऊ शकतो.
या निर्णयामुळे देशातील 'रियल मनी गेम' उद्योगाला मोठा धक्का बसला आहे. आर्थिक वर्ष 24 मध्ये या उद्योगाने तब्बल 2.4 अब्ज डॉलरची कमाई केली होती, जी भारतातील एकूण गेमिंग कमाईचा मोठा हिस्सा होता.
तुमचे पैसे काढताना काही समस्या येत असल्यास, संबंधित कंपनीच्या सपोर्ट टीमशी संपर्क साधा.