When Sunil Gavaskar Joked About Choking Sachin Tendulkar: भारतीय क्रिकेटच्या इतिहासातील दोन महान दिग्गज म्हणजे सुनील गावस्कर आणि सचिन तेंडुलकर. या दोन खेळाडूंमधील एक अतिशय जुना आणि मजेशीर किस्सा सध्या सोशल मीडियावर पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. 1995 मधील एका मुलाखतीमधील हा किस्सा आहे. या मुलाखतीमध्ये गावस्कर यांनी सचिनला चक्क त्याचा 'गळा घोटण्याची' धमकी दिली होती. अर्थात ही धमकी रागात दिलेली नसून, सचिनच्या प्रतिभेवर असलेल्या विश्वासापोटी गावस्कर सरांनी ती मिश्किलपणे दिली होती.संपूर्ण किस्सा समजल्यानंतर तुम्हाला या दोन दिग्गजांमधील नातं आणि एकमेकांबद्दलचा आदर याची पुन्हा एकदा जाणीव होईल.
गावस्करांनी सांगितले गुपित
या जुन्या मुलाखतीत सुनील गावस्कर यांनी बॅटिंगमधील एका महत्त्वाच्या तांत्रिक बाजूवर प्रकाश टाकला आहे. बॅटिंग करताना बॉलवर नजर ठेवणे किती महत्त्वाचे असते, हे त्यांनी सचिनला समजावून दिले. गावस्करांनी यावेळी सांगितलं की, बॅटरची नजर बॉलवर स्थिर असेल, तर बॉल शरीराला लागण्याची शक्यता खूपच कमी असते. डोळे आणि हातांचा ताळमेळ बसला की शरीर आपोआप प्रतिक्रिया देते.
बॅटर एकतर बॉल सोडून देतो किंवा तो डक करतो. गावस्करांनी यावेळी सचिनचे कौतुक करताना म्हटले की, तू अनेक वेळा मैदानावर हे करून दाखवले आहे आणि हीच तुझी खरी ताकद आहे.
( नक्की वाचा : Rahul Dravid : सचिन तेंडुलकरचा 'तो' सल्ला ऐकल्याचा पश्चाताप, राहुल द्रविडनं बोलून दाखवली खंत )
सचिनला दिली धमकी
मुलाखती दरम्यान गावस्कर सरांनी सचिनच्या भविष्याबद्दल एक मोठी भविष्यवाणी केली होती. ते म्हणाले होते की, सचिन भारतासाठी खूप जास्त रन करेल यात शंका नाही. याच वेळी त्यांनी सचिनला एक मजेशीर आव्हान दिले. गावस्कर म्हणाले की, करिअर संपताना सचिनच्या नावावर किमान 15000 रन आणि 40 टेस्ट सेंच्युरी नसतील, तर मी स्वतः जाऊन त्याचा गळा घोटेन. त्यांनी पुढे हसत हसत असेही म्हटले की, 20 वर्षांनंतर माझ्या हातात कदाचित तितकी ताकद नसेल, पण मी हे काम करण्यासाठी दुसऱ्या कोणाची तरी नियुक्ती करेन.
सचिनने दिले सडेतोड उत्तर
गावस्करांनी दिलेले आव्हान सचिननं किती गांभीर्याने घेतलं, हे त्याच्या आकडेवारीवरून स्पष्ट दिसते. सचिनने गावस्करांच्या अपेक्षेपेक्षा कितीतरी पटीने मोठी कामगिरी करून दाखवली.
गावस्करांनी सचिनला 15000 रनचे टार्गेट दिले होते. सचिनने टेस्ट क्रिकेटमध्ये 15921 रन केले. इतकेच नाही तर गावस्करांनी किमान 40 टेस्ट सेंच्युरींची अपेक्षा व्यक्त केली होती, पण सचिनने तब्बल 51 टेस्ट सेंच्युरी झळकावून इतिहास रचला. सचिनने गावस्करांना आणि संपूर्ण देशाचा मान राखत स्वतःला क्रिकेटचा देव का मानले जाते, हे जगाला दाखवून दिले.
इथे पाहा VIDEO