Avani Lekhara : मनू भाकरनं एका ऑलिम्पिक स्पर्धेत दोन मेडल जिंकून इतिहास घडवला आहे. मनूनं हा रेकॉर्ड करण्यापूर्वीच एका भारतीय खेळाडूनं हा रेकॉर्ड पॅरालिम्पिक स्पर्धेत केला होता. जयपूरच्या अवनी लखेरानं 2021 साली टोक्योमध्ये झालेल्या पॅरालिम्पिक स्पर्धेत शूटिंगमध्ये गोल्ड आणि ब्रॉन्झ मेडलची कमाई केली होती. अवनीनं तीन वर्षांनी पॅरिसमध्येही गोल्ड मेडलला गवसणी घातलीय. अवनीनं महिलांच्या 10 मीटर एअर रायफल (SH1) स्पर्धेत गोल्ड मेडल पटकावलं. भारताच्या मोना अगरवालनंही याच गटात ब्रॉन्झ मेडलची कमाई केली. त्यामुळे पॅरिस पॅरालिम्पिक स्पर्धेच्या दुसऱ्याच दिवशी भारतानं पदकांची दमदार बोहणी केली आहे.
11 व्या वर्षी बदललं आयुष्य
कितीही मोठं संकट आलं तरी मनात दृढनिश्चय आणि उत्कृष्टतेचा ध्यास असेल तर काय करता येतं हे अवनीनं सिद्ध केलं आहे. अवनी मुळची जयपूरची. 2012 साली वयाच्या 11 व्या वर्षी कार अपघातामध्ये ती गंभीर जखमी झाली.
व्हिलचेअर ते गोल्डन गर्ल अवनीच्या या प्रवासात तिच्या वडिलांची मोठी भूमिका आहे. शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या अवनीनं तो आघात विसरावा यासाठी त्यांनी तिला खेळाची निवड करण्यासाठी प्रोत्साहन दिलं. शारीरिक हलचालींना मर्यादा असूनही तिनं तिरंदाजी या खेळाची निवड केली. फोकस, शिस्त आणि अचूकता हे गुण तिला या खेळातून शिकता आले.
( नक्की वाचा : Paralympics 2024: अवनी लेखरानं रचला इतिहास, पॅरालिम्पिक स्पर्धेत सलग दुसऱ्यांदा पटकावले गोल्ड मेडल )
कुणापासून मिळाली प्रेरणा?
बीजिंग ऑलिम्पिकमधील गोल्ड मेडल विजेता अभिनव बिंद्रा हा अवनीचा आदर्श. अवनीनं अभिनवपासून प्रेरणा घेत 2015 नेमबाजीमध्ये पदार्पण केलं. अवनीच्या सचोटीला यश मिळालं. तिनं राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धा जिंकल्या. ज्युनिअर आणि सिनिअर गटात वर्ल्ड रेकॉर्ड करत पॅरा शूटिंग विश्वात तिनं अगदी कमी कालावधीमध्ये स्वत:ची जागा निर्माण केली.
शूटिंगच्या सरावाच्या खडतर दिनचर्येतही अवनीनं अभ्यासाकडं दुर्लक्ष केलेलं नाही. राजस्थान विद्यापीठातून ती पदवीचं शिक्षण घेत आहे. अवनीचं अभ्यासातील यश ती या क्षेत्रातही सरस असल्याचं सिद्ध करतं.
टोक्योमध्ये इतिहास
टोक्योमध्ये तीन वर्षांपूर्वी झालेल्या पॅरालिम्पिक स्पर्धेत अवनीनं ऐतिहासिक कामगिरी केली. टोक्यो ऑलिम्पिकमध्ये तिनं गोल्ड आणि ब्रॉन्झ मेडलची कमाई केली. एकाच पॅरालिम्पिक स्पर्धेत दोन मेडल मिळवणारी ती पहिली भारतीय महिला आहे. या कामगिरीबद्दल अवनीचा पद्मश्री तसंच खेलरत्न पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला आहे. हे पुरस्कार फक्त खेळातील यशाचे नाही तर तिच्या चिकाटी, धैर्य आणि प्रतिकूल परिस्थितीवर विजय मिळवण्याच्या क्षमतेचे पुरावेही आहेत.