अमेरिकेत सध्या टी 20 वर्ल्ड कप सुरू आहे. या स्पर्धत पहिला धक्कादायक निकालाची नोंद अमेरिकेने केली आहे. तगड्या समजल्या जाणाऱ्या पाकिस्तानला अमेरिकेने सुपर ओव्हरमध्ये पराभूत केले. या विजयामुळे टी 20 क्रिकेट वर्ल्डकपमध्ये खळबळ उडाली आहे. मात्र या विजयात चमकला मुळचा मुंबईकर असलेला सौरभ नेत्रावळकर. या मराठमोळ्या मुंबईकराने सुपर ओव्हरमध्ये कमाल करत पाकिस्तानला विजयापासून रोखले. त्यामुळे अमेरिकेचा विजय सुकर झाला.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
कोण आहे सौरभ नेत्रावळकर?
सौरभ हा मुळचा मुंबईकर आहे. त्याचा जन्म 1991 सालचा आहे. सौरभ हा भारताच्या U19 वर्ल्ड कप टीमचाही भाग होता. तो 2010 साली भारताच्या अंडर 19 संघाकडून खेळला होता. 2010 च्या U19 वर्ल्ड कप फायनलमध्ये बाबर आजमच्या टीमकडून भारताचा पराभव झाला होता. त्या संघात सौरभ होता. विशेष म्हणजे त्या वर्ल्ड कपमध्ये त्यांने सर्वाधिक विकेट ही घेतल्या होत्या. सौरभच्या नावावर 9 विकेटस् होत्या.
हेही वाचा - T20 WC 2024 : टीम निवडीमध्ये चूक झाली! आयर्लंडविरुद्धच्या विजयानंतर रोहित शर्माची कबुली?
सौरभ पक्का मुंबईकर
सौरभ नेत्रावळकर हा पक्का मुंबईकर आहे. तो मुंबईच्या संघाकडून रणजी ट्रॉफिही खेळला आहे. सौरभ हा के.एल. राहुल, मयांक अग्रवाल, हर्षल पटेल, जयदेव उनाडकट, संदीप शर्माचा टीममेट आहे. भारतीय क्रिकट संघा स्थान मिळवण्यासाठी मोठी स्पर्धा आहे. अशा वेळी त्याने 2015 साली अमेरिकेत जाण्याचा निर्णय घेतला होता.
सौरभ अमेरिकेकडे वळला
सौरभ भारतात स्थानिक क्रिकेट खेळत होता. मात्र त्याने 2015 साली अमेरिकेत जाण्याचा निर्णय घेतला. अमेरिकेतही तो क्रिकेट खेळू लागला. त्याने तिथल्या राष्ट्रीय संघात स्थान मिळावले. शिवाय तो कर्णधारही झाला. सौरभ क्रिकेटसोबतच ओरॅकलचा इंजिनिअरही आहे. त्याने कॉर्नेल विद्यापीठातून कॉम्प्युटर सायन्सची पदवीही घेतली आहे. ओरॅकलच्या प्रिन्सिपल टीमचा तो सदस्य आहे.
सौरभची चमकदार कामगिरी
पाकिस्तान विरूद्ध झालेल्या सामन्या सौरभने चमकदार कामगिरी केली. त्यांनी सामन्याच्या सुरूवातीला चार ओव्हर टाकत 18 धावा देत दोघांना बाद केले. मात्र सामना नंतर सुपर ओव्हरमध्ये गेला. त्यामुळे अमेरिकेच्या कॅप्टनने बॉल सौरभच्या हाती दिला. सुपर ओव्हरमध्ये पाकिस्तानला विजयासाठी सहा चेंडूत 19 धावांची गरज होती. यावेळी सौरभने टिच्चून मारा करत पाकिस्तानला 13 धावांवर रोखलं. शिवाय एक विकेटही घेतली. त्यामुळे अमेरिकेचा विजय शक्य झाला. अमेरिकेच्या या विजयामुळे नवख्या अमेरिकेने पाकिस्तानला धक्का दिला आहे. यामुळे वर्ल्डकपमध्येही मोठा उलटफेरे होवू शकतो.