Who is Vaishnavi Sharma? : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या आगामी टेस्ट मॅचसाठी टीम इंडिया जाहीर झाली आहे. या टीममधील एका नव्या चेहऱ्याची सर्वाधिक चर्चा रंगली आहे. ती म्हणजे 20 वर्षांची डावखुरी स्पिन बॉलर वैष्णवी शर्मा. ऑस्ट्रेलियाच्या वाका मैदानावर 6 मार्च रोजी होणाऱ्या या टेस्टसाठी निवडण्यात आलेल्या 15 सदस्यीय संघात वैष्णवीचा समावेश करण्यात आला आहे.
विशेष म्हणजे कसोटी पदार्पणाच्या उंबरठ्यावर उभी असलेली ही तरुणी नेमकी कोण आहे आणि तिने इतक्या कमी वयात भारतीय संघात स्थान कसे मिळवले, याबाबत आता फॅन्समध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.
ज्योतिषाचार्य वडिलांचा सल्ला आणि क्रिकेटचा प्रवास
वैष्णवी मूळची मध्य प्रदेशातील ग्वाल्हेरची आहे. तिची क्रिकेटमधील एन्ट्री जितकी रंजक आहे तितकीच प्रेरणादायी सुद्धा आहे. वैष्णवीचे वडील पेशाने ज्योतिषाचार्य आणि प्राध्यापक आहेत. असे म्हणतात की, तिच्या वडिलांनीच तिला करिअर निवडताना एक मोलाचा सल्ला दिला होता.
त्यांनी वैष्णवीला सांगितले होते की, तिने एकतर वैद्यकीय क्षेत्र निवडावे किंवा खेळात आपले नशीब आजमावावे, या दोन्ही क्षेत्रात तिला मोठे यश मिळेल. वडिलांच्या सल्ल्यानुसार वैष्णवीने क्रिकेटची बॅट आणि बॉल हातात धरला आणि आज ती भारतीय कसोटी संघापर्यंत पोहोचली आहे. जेव्हा तिने खेळण्याचे ठरवले, तेव्हा तिच्या संपूर्ण कुटुंबाने तिला खंबीर साथ दिली.
( नक्की वाचा : VIDEO : 'मी स्वतः येऊन तुझा गळा दाबेन', गावस्कर सचिनला असं का म्हणाले होते? तेंडुलकरचं सडेतोड उत्तर! )
अंडर-19 वर्ल्ड कपमध्ये गाजवले मैदान
वैष्णवी खऱ्या अर्थाने प्रकाशझोतात आली ती यावर्षी फेब्रुवारी महिन्यात झालेल्या महिला अंडर-19 विश्वचषकामुळे. या स्पर्धेत तिने भारताचे प्रतिनिधित्व करताना प्रतिस्पर्धी बॅटर्सची दाणादाण उडवली होती. तिने संपूर्ण स्पर्धेत तब्बल 17 विकेट्स घेतल्या, ज्यात एका शानदार हॅट्रिकचाही समावेश होता.
या कामगिरीमुळेच निवड समितीच्या नजरेत ती भरली होती. फक्त ज्युनिअर लेव्हलवरच नाही, तर सीनियर महिला T20 मध्ये 21 विकेट्स आणि आंतर-क्षेत्रीय स्पर्धेत 12 विकेट्स घेत तिने सातत्याने आपली छाप पाडली आहे.
श्रीलंकेविरुद्ध आंतरराष्ट्रीय पदार्पण
वैष्णवीची मेहनत आणि कौशल्य पाहून तिला श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेत भारतीय संघात स्थान मिळाले. 21 डिसेंबर 2025 रोजी तिने टीम इंडियासाठी आपली पहिली आंतरराष्ट्रीय कॅप मिळवली. आपल्या पहिल्याच सामन्यात तिने अत्यंत टिच्चून गोलंदाजी केली. तिने 4 ओव्हर्समध्ये अवघ्या 16 रन देऊन आपली उपयुक्तता सिद्ध केली. वैष्णवी केवळ एक उत्तम स्पिनर नाही, तर ती खालच्या क्रमांकावर उपयुक्त बॅटिंगही करू शकते, ज्यामुळे ती एक परफेक्ट ऑलराउंडर म्हणून उदयास येत आहे.
श्रीलंका विरुद्धच्या सीरिजमध्ये वैष्णवीनं भारतीय फॅन्सचं लक्ष स्वत:कडं वेधून घेतलं. तिचं सेलिब्रेशन आणि लूक याची चर्चा सुरु झाली. तसंच ती नवी नॅशनल क्रश म्हणूनही उदयाला येत आहे.
ऑस्ट्रेलियाच्या आव्हानासाठी सज्ज
ऑस्ट्रेलियातील खेळपट्ट्या साधारणपणे फिरकीपटूंसाठी आव्हानात्मक मानल्या जातात. तिथे बॉलला जास्त फ्लाईट देण्याचे धाडस सहसा स्पिनर करत नाहीत, पण वैष्णवीची ताकद हीच आहे की ती कोणत्याही परिस्थितीत बॉल हवेत सोडून बॅटरला फसवण्यास घाबरत नाही. भारतीय टीम मॅनेजमेंटला तिची हीच आक्रमक शैली भावली आहे. ऑस्ट्रेलियाच्या वेगवान खेळपट्ट्यांवर ही फिरकीची जादू चालवण्यासाठी वैष्णवी आता सज्ज झाली आहे.
प्रतिका रावलचे पुनरागमन आणि कसोटी संघ
वैष्णवीसोबतच या संघात सलामीवीर प्रतिका रावलचे पुनरागमन झाले आहे. 2025 च्या वनडे विश्वचषकात भारताला विजेतेपद मिळवून देण्यात प्रतिकाचा मोठा वाटा होता. त्या स्पर्धेत तिने 6 डावात 308 रन केले होते, ज्यात दोन हाफ सेंच्युरीचा समावेश होता.
दुखापतीमुळे ती काही काळ बाहेर होती, पण आता ती पुन्हा एकदा स्मृती मानधनासोबत सलामीला येण्यासाठी तयार आहे. या टेस्ट मॅचसाठी हरमनप्रीत कौरकडे नेतृत्व असून स्मृती मानधना व्हाईस कॅप्टन असेल.
भारतीय महिला टेस्ट टीम
हरमनप्रीत कौर (कॅप्टन), स्मृती मानधना (व्हाईस कॅप्टन), शफाली वर्मा, जेमिमा रॉड्रिग्स, रिचा घोष (विकेट किपर), दीप्ती शर्मा, रेणुका सिंह, स्नेह राणा, अमनजोत कौर, उमा छेत्री (विकेट किपर), प्रतिका रावल, हरलीन देओल, क्रांती गौड, वैष्णवी शर्मा, सायली सातघरे.