जय शहांनंतर BCCI सचिव कोण होणार? काँग्रेस नेत्यासह महाराष्ट्र भाजपामधील दिग्गजचीही चर्चा

Who Will Replace Jay Shah in BCCI : जय शाह ICC मध्ये गेले तर बीसीसीआयमध्ये त्यांची जागा कोण घेणार? हा प्रश्न आता विचारला जात आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
मुंबई:

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (BCCI) सचिव जय शाह हे लवकरच इंटरनॅशनल क्रिकेट कौन्सिल (ICC) या क्रिकेटचं नियंत्रण करणाऱ्या सर्वोच्च संस्थेचे संचालक होण्याची शक्यता आहे. आयसीसीचे विद्यमान संचालक ग्रेग बार्कले यांचा कार्यकाळ 30 नोव्हेंबर रोजी समाप्त होत आहे. बार्केले यांनी सलग तिसऱ्यांदा आयसीसी संचालक होण्यास नकार दिलाय. त्यामुळे या पदासाठी जय शाह यांचं नाव आघाडीवर आहे. इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया दोन दिग्गज क्रिकेट बोर्डानंही त्यांच्या नावाला पाठिंबा दिला आहे.

( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

कोण होणार BCCI सचिव?

जय शाह ICC मध्ये गेले तर बीसीसीआयमध्ये त्यांची जागा कोण घेणार? हा प्रश्न आता विचारला जात आहे. बीसीसीआयच्या रचनेत सचिव हे महत्त्वाचं पद आहे. जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट बोर्डाच्या सचिव पदासाठी अनेक नावं चर्चेत आहेत.

राजीव शुक्ला

जय शाह यांचा सचिवपदाचा आणखी एक वर्षांचा कालावधी शिल्लक आहे. त्या परिस्थितीमध्ये बीसीसीआयचे सध्याचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला त्यांची जागा घेऊ शकतात. राजीव शुक्ला काँग्रेसचे राज्यसभा खासदार आहेत. त्यांना गेल्या दोन दशकांपासून बीसीसीआयच्या कामकाजाचा अनुभव आहे. त्यांचा हा अनुभव या नियुक्तीसाठी निर्णायक ठरु शकतो.

आशिष शेलार

महाराष्ट्र भाजपातील ज्येष्ठ नेते असलेले आशिष शेलार सध्या बीसीसीआयचे कोषाध्यक्ष आहेत. मुंबई क्रिकेट असोसिएशनमध्येही त्यांचा दबदबा आहे. आघाडीचे राजकीय नेते म्हणून त्यांचं नाव चर्चेत आहे. अर्थात सचिव म्हणून त्यांना बीसीसीआयच्या कामकाजाला बराच वेळ द्यावा लागेल. व्यस्त राजकारणी असलेले शेलार हा वेळ काढणार का? हा प्रश्न आहे.

Advertisement

( नक्की वाचा : Jay Shah : जय शाह होणार ICC चे बॉस, करणार नवा रेकॉर्ड )

अरुण धुमल

सध्या आयपीएल संचालक असलेल्या अरुण धुमल यांना बीसीसीआयच्या कामकाजाचा मोठा अनुभव आहे. ते यापूर्वी बीसीसीआयचे कोषाध्यक्षही होते. जय शहांच्या जागी त्यांच्या नावावरही सहमती होऊ शकते.

या तीन प्रमुख नावांसोबतच रोहन जेटली, अविशेख डालमिया, दिलशेर खन्ना, प्रभतेज भाटिया या तरुण प्रशासकांची नावंही सचिवपदासाठी चर्चेत आहेत. आयसीसी संचालक पदासाठी अर्ज भरण्याची शेवटची तारीख 27 ऑगस्ट आहे. जय शहांनी या पदासाठी अर्ज भरल्यानंतरच सचिव पदाची प्रक्रिया वेग घेईल. 
 

Advertisement
Topics mentioned in this article