Yuvraj Singh Cancer Battle : भारतीय क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात मोठा मॅच विनर म्हणून ओळखला जाणारा युवराज सिंहच्या आयुष्याचा प्रवास थक्क करणारा आहे. 2007 चा टी20 वर्ल्ड कप असो किंवा 2011 चा वनडे वर्ल्ड कप, आपल्या बॅटने आणि बॉलने प्रतिस्पर्ध्यांना धूळ चारणाऱ्या या खेळाडूने मैदानावर जितक्या लढाया जिंकल्या, त्यापेक्षा मोठी लढाई त्याने आयुष्याच्या मैदानात कॅन्सरविरुद्ध जिंकली. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत युवीने त्याच्या आयुष्यातील त्या काळातील एक असा अनुभव सांगितलाय, जो ऐकून कोणाच्याही अंगावर शहारे येतील.
जेव्हा डॉक्टर म्हणाले तुझ्याकडे फक्त 3 ते 6 महिने उरलेत
2011 चा वर्ल्ड कप जिंकल्यानंतर युवराजची तब्येत बिघडली होती आणि त्याला कॅन्सर झाल्याचे निदान झाले. यावेळी दिल्लीत असताना डॉक्टर नितेश रोहतगी यांनी युवराजला दिलेला इशारा अत्यंत भयानक होता. डॉक्टर त्याला म्हणाले होते की, तुझा ट्यूमर हृदय आणि फुफ्फुसांच्यामध्ये आहे. तू आता क्रिकेट खेळायला गेलास तर तुला हार्ट अटॅक येऊ शकतो आणि तू तातडीने केमोथेरपी सुरू केली नाहीस, तर तुझ्याकडे जगण्यासाठी फक्त 3 ते 6 महिने उरले आहेत.
हा तो काळ होता जेव्हा युवी आपल्या करिअरच्या शिखरावर होता आणि सात वर्षांच्या प्रतीक्षेनंतर त्याला टेस्ट टीममध्ये जागा मिळण्याची खात्री होती.
( नक्की वाचा : Mumbai Cricket: अहमदाबादला टक्कर! मुंबईत उभं राहतंय 1 लाख क्षमतेचं अवाढव्य क्रिकेट स्टेडियम; जाणून घ्या सर्व )
मृत्यूची भीती नव्हती पण...
युवराजने सांगितले की, त्याला मरणाची भीती वाटत नव्हती, पण हक्काची मिळालेली कसोटी संघातील जागा जाईल की काय, ही चिंता त्याला सतावत होती. त्याने सुरुवातीला डॉक्टरांना असेही म्हटले होते की, मी मेलो तरी चालेल पण मला खेळायचे आहे. मात्र, जेव्हा परिस्थिती हाताबाहेर गेली, तेव्हा उपचारांसाठी तो अमेरिकेला गेला. तिथे गेल्यानंतर त्याला सांगण्यात आले की, तो कदाचित पुन्हा कधीच क्रिकेट खेळू शकणार नाही. या विचाराने तो मानसिकदृष्ट्या खचला होता, कारण क्रिकेटशिवाय तो स्वतःला शून्य समजत होता.
दिग्गजांची साथ आणि फिनिक्स भरारी
उपचारांच्या कठीण काळात अनिल कुंबळे आणि सचिन तेंडुलकर सारख्या दिग्गजांनी युवराजची भेट घेऊन त्याला धीर दिला. कुंबळेने तर त्याला क्रिकेटचे व्हिडिओ पाहण्यापासून रोखले आणि पूर्णपणे आरोग्यावर लक्ष केंद्रित करायला सांगितले. अमेरिकेतील डॉक्टरांनी दिलेल्या विश्वासामुळे आणि स्वतःच्या जिद्दीमुळे युवराजने केवळ कॅन्सरवर मातच केली नाही, तर अवघ्या 6 महिन्यात पुन्हा भारतीय संघात पुनरागमन केले.
( नक्की वाचा : Sachin Tendulkar : 'युवी' नव्हे, धोनीच का? 2011 वर्ल्ड कपमधील ऐतिहासिक क्षणामागचे गुपित अखेर सचिननेच सांगितले )
त्याने टी20 वर्ल्ड कपमध्ये मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कारही पटकावला. झहीर खानसोबत फ्रान्समध्ये जाऊन विशेष ट्रेनिंग घेतल्यानंतर त्याने पुन्हा एकदा आपली जुनी लय प्राप्त केली आणि जगाला दाखवून दिले की जिद्द असेल तर मृत्यूवरही विजय मिळवता येतो.