Mahesh Tutorials च्या 33 शाखा बंद? विद्यार्थी अरिहंत अकादमीत शिफ्ट? विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला

राज्यातील नामांकित कोचिंग क्लासेसपैकी एक असलेल्या महेश ट्युटोरियल्सबाबत धक्कादायक माहिती समोर येत आहे. राज्यातील तब्बल 33 शाखा बंद झाल्याचा दावा पालकांकडून करण्यात येत असून, चेंबूर शाखेतील शिक्षकांना राजीनामे देण्यास सांगण्यात आल्याची माहितीही समोर आली आहे. अंधेरी शाखादेखील काही दिवसांपूर्वी बंद करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, महेश ट्युटोरियल्समधील विद्यार्थ्यांना अरिहंत अकादमीत हलवण्यात येत असल्याची माहिती पालकांनी दिली आहे. यासाठी महेश ट्युटोरियल्सच्या अधिकाऱ्यांनी अरिहंत अकादमीच्या व्यवस्थापनाशी चर्चा करून विद्यार्थ्यांना त्यांच्या शाखांमध्ये सामावून घेण्याची विनंती केल्याचंही सांगितलं जात आहे. मात्र अचानक शिक्षक बदलल्यामुळे विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर परिणाम होऊ शकतो, अशी चिंता पालक व्यक्त करत आहेत. जवळपास तीन हजार विद्यार्थ्यांची फसवणूक झाल्याचा आरोप करत पालकांनी शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्याकडे निवेदन दिले आहे. विशेष म्हणजे, क्लासेस का बंद केले जात आहेत याबाबत कोणतेही अधिकृत कारण अद्याप समोर आलेले नाही. त्यामुळे आता खासगी कोचिंग क्लासेससंदर्भातील नियम आणि कायद्याचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे.

संबंधित व्हिडीओ