कल्याण-डोंबिवली परिसरासह मुंबई उपनगरात हजारो नागरिकांची आर्थिक फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. जास्त परतावा आणि जुनी गुंतवणूक परत मिळवून देण्याचे आमिष दाखवत प्रशांत आंगणे नावाच्या व्यक्तीने कोट्यवधी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप करण्यात आला आहे. पीडितांच्या म्हणण्यानुसार, गेल्या सहा वर्षांपासून विविध योजनांच्या नावाखाली गुंतवणूकदारांना नवीन डेडलाईन आणि परताव्याची आश्वासने देत पैसे उभे करण्यात आले. सोशल मीडियावरील व्हिडीओंच्या माध्यमातून विश्वास संपादन करून नागरिकांना पुन्हा पुन्हा गुंतवणूक करण्यास भाग पाडल्याचा आरोपही करण्यात येत आहे. या प्रकरणात १०० हून अधिक गुंतवणूकदारांनी ठाणे आर्थिक गुन्हे शाखा आणि डोंबिवलीतील रामनगर पोलीस ठाण्यात तक्रारी दाखल केल्या आहेत. काहींनी घर विकून तर काहींनी निवृत्तीवेतन आणि आयुष्यभराची बचत या योजनांमध्ये गुंतवल्याचा दावा केला असून, अनेक कुटुंबांवर आर्थिक संकट ओढावले आहे. दरम्यान, मुख्य आरोपी प्रशांत आंगणे याला २०२३ मध्येही फसवणुकीच्या प्रकरणात अटक झाली होती, अशी माहिती समोर आली आहे.
Kalyan News 5,000 people defrauded with the lure of high returns; allegations of a multi-crore scam