अकोला जिल्ह्यात पावसाने गेल्या दोन महिन्यांपासून दडी मारल्याने शेतीपिकांसह जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर झाला आहे....सोयाबीन, मूग आणि उडदापासून मिळणारे कुटार यंदा अत्यल्प असल्याने पशुपालकांसमोर मोठे संकट उभे राहिले आहे. शिवारात उपलब्ध असलेला चारा केवळ आठ दिवस पुरेल, अशी स्थिती असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे जनावरांसाठी चारा छावण्या सुरू कराव्यात आणि पिण्याच्या पाण्याची तातडीने व्यवस्था करावी, अशी मागणी शेळी व्यावसायिकांसह पशुपालकांकडून होत आहे. दरम्यान, चार लाख रुपये किमतीची बैलजोडी आता केवळ 80 हजार रुपयांपर्यंत विकली जात असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. पावसाअभावी पशुधन सांभाळणेही शेतकऱ्यांसाठी मोठे आव्हान ठरत आहे.