एरवी दुष्काळानं होरपळणाऱ्या मराठवाड्यात निसर्ग कोपला आणि सगळीकडे हाहाकार उडालाय. एरवी पावसाअभावी करपणारं पिक आता पाण्यानं पिवळं पडून करपलंय. उसाचे फडची फड पाण्याखाली गेलेत. तिथं सोयाबिन, कापूस किंवा अन्य पिकांचं काय... शेतातलं फक्त पिकच नाही तर मातीही खरवडून गेलीय. दुभत्या जनावरांनी दावणीलाच आपला प्राण सोडलाय. सुरुवातीला चांगला पाऊस पडलेल्या शेतकऱ्यानं आता कुठं स्वप्न पाहायला सुरुवात केली होती, पण त्या स्वप्नांवर आता पाणी फेरलं गेलंय. कुणी धाय मोकलून रडतोय, कुणी डोळ्यात पाणी आलेलं असताना, आवंढा गिळून नशिबाला दोष देत बसलाय. अशा दुष्काळ आणि ओला दुष्काळाच्या फेऱ्यात मराठवाडा अडकलाय. अशावेळी शेतकऱ्यांनी, सामान्य नागरिकांना धीर देण्यासाठी तिथले लोकप्रतिनिधी जिवाची पर्वा न करता दिवसरात्र शेतात, बांधावर उतरलेत. त्यात धाराशिवचे ठाकरे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर आघाडीवर आहेत.