देशातील सर्वात मोठ्या सार्वजनिक क्षेत्रातील बँक असलेल्या एसबीआयच्या नवी मुंबईतील ग्लोबल आयटी सेंटरमध्ये सायबर घुसखोरी झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. बँकेच्या सर्व्हरमध्ये अनधिकृत प्रवेश करून 'योनो 2.0' आणि 'रास' या महत्त्वाच्या अॅप्लिकेशनमधील तब्बल 3 लाख 75 हजार नोंदी चोरीला गेल्याचा आरोप करण्यात आला आहे. एवढेच नव्हे तर चोरी केलेला डेटा डार्क वेबवर प्रसारित केल्याचाही संशय व्यक्त करण्यात आला आहे. या प्रकरणी सीबीडी बेलापूर पोलिसांनी अज्ञात हॅकरविरोधात गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. देशातील कोट्यवधी ग्राहकांच्या डिजिटल बँकिंग सुरक्षेबाबत या घटनेमुळे गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.