जागतिक बाजारातील घडामोडी आणि देशांतर्गत मागणीत झालेल्या प्रचंड वाढीमुळे चांदीप्रमाणेच सोने दराचा भडका उडाला आहे. काही दिवसांपूर्वीच २४ कॅरेट सोन्याने दीड लाखांचा टप्पा ओलांडला होता. आता २२ कॅरेट सोनेही दीड लाख पार गेल्याने, सोने खरेदी सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेली आहे. शनिवारी एका दिवसात २४ कॅरेट सोन्यात तब्बल दोन हजारांची वाढ नोंदविली गेली. २२ कॅरेट सोनेही दोन हजारांनी वधारल्याने, ते दीड लाख पार गेले, तर चांदीतील दरवाढीचा वेग हा शनिवारीदेखील विक्रमी राहिला. चांदीत एका दिवसात तब्बल २३ हजार ७१० रुपयांची विक्रमी वाढ नोंदविली गेली. दरवाढीचा हा वेग प्रचंड असल्याने, चांदीने साडेतीन लाखांचा टप्पा अवघ्या काही दिवसांतच पूर्ण केला आहे.