मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर 33 तास अडकलेल्या लोकांसाठी दिलासादायक बातमी.. कारण या वाहनचालकांना लवकरच टोल रिफंड मिळणार आहे. मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर गॅस टँकर उलटल्याने 33 तासांची वाहतूक कोंडी झाली होती. अनेक किलोमीटरपर्यंत 1 लाखांहून अधिक वाहनं अडकून पडली होती. वाहनचालकांना तसंच प्रवाशांना पाणी, अन्न तसंच इतर आवश्यक सुविधांच्या कमतरतेचा सामना करावा लागला होता. ही परिस्थिती पाहता प्रशासनाने टोल वसुली रोखण्याचा निर्णय घेतला होता. तरीही अनेकांच्या खात्यातून पैसे वजा झाले.. टोल वसुली थांबवण्याचा आदेश जारी झाल्यानंतरही वाहन मालकांकडून वसूल केलेले संपूर्ण पैसे परत करण्याचा निर्णय आता घेण्यात आला आहे. या सर्व वाहन चालकांना एकूण ५.१६ कोटींचा निधी परत मिळणार आहे. हा रिफंड एक्सप्रेसवेसह पुणे-बंगळुरू राष्ट्रीय राजमार्गावर वसुल केलेल्या टोलवरही लागू असेल.. येत्या आठवड्यात ही रक्कम संबंधित वाहनचालकांच्या फास्टटॅग खात्यात जमा करण्यात येईल.