पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्याच्या पठार भागातील अनेक गावांमध्ये पुरेसा पाऊस न झाल्याने सोयाबीन पिके करपून गेली आहेत. पावसाच्या आशेवर शेतकऱ्यांनी केलेली पेरणी वाया गेल्याने उत्पादनाची अपेक्षा जवळपास संपुष्टात आली आहे. विशेष म्हणजे या भागांचा दुष्काळग्रस्त यादीत समावेश नसल्याने शेतकऱ्यांना शासनाच्या सवलती आणि मदतीचा लाभ मिळणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. परतीचा पाऊस झाला तरी हातातून गेलेल्या सोयाबीन पिकांना त्याचा फारसा फायदा होणार नसल्याने शेतकऱ्यांसमोर आर्थिक संकट उभे ठाकले आहे. त्यामुळे प्रशासनाने तालुकानिहाय नव्हे तर गावनिहाय परिस्थितीचा आढावा घेऊन नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत करावी, अशी मागणी होत आहे. यासंदर्भात आमचे प्रतिनिधी अविनाश पवार यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधून परिस्थितीचा आढावा घेतला आहे.