अभिनेता राजपाल यादववर अटकेची टांगती तलवार आहे. 2010 सालच्या चेक बाऊन्स प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने जोरदार ताशेरे ओढले आहेत. यादव याने कर्ज घेतले होते आणि या प्रकरणात कोर्टाने २ कोटी रुपये कोर्टामध्ये जमा करण्यासाठी मुदत दिली होती. ही मुदत राजपालने न पाळल्याने त्याच्यावर कोर्ट प्रचंड संतापले आहे. सरन्यायाधीश सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची आणि न्यायमूर्ती व्ही. मोहना यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली. सुनावणी दरम्यान राजपाल यादवच्या वकिलांनी तक्रारदार कंपनी श्रीमंत असल्याचे म्हटले. यावर न्यायमूर्ती बागचींनी म्हटले की, "तक्रारदार कंपनी तुमच्यापेक्षा श्रीमंत असेल, पण तुम्ही त्यांची फसवणूक केली आहे. तुमचे अहंकारी वर्तन तुरुंगात गेल्यावरच ताळ्यावर जागेवर येईल. तुम्हाला कधी आणि काय बोलायचे हे समजले पाहिजे, तुमची खरी जागा तुरुंगातच आहे."