पुण्यातील समरसता लोककला संमेलनात पद्मश्री पुरस्कार परत करण्याचा इशारा देत राज्य सरकारवर जोरदार टीका करणारे ज्येष्ठ लोककलावंत पद्मश्री रघुवीर खेडकर यांनी अवघ्या दोन दिवसांत यू-टर्न घेतलाय. मुख्यमंत्री आणि सांस्कृतिक मंत्री कार्यक्रमाला अनुपस्थित राहिल्याने नाराज झालेल्या खेडकरांनी तीव्र शब्दात प्रतिक्रिया दिली होती. मात्र, आता माझा गैरसमज झाला होता अशी कबुली देत त्यांनी आपल्या वक्तव्याबद्दल खंत व्यक्त केली आहे. तसेच, पद्मश्री पुरस्काराचा अपमान झाला असल्याची जाणीवही त्यांनी व्यक्त करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जाहीर माफी मागितली आहे. इतकंच नाही, तर फडणवीस सरकारने लोककलेसाठी केलेल्या कामाचं कौतुकही त्यांनी केलं आहे. त्यामुळे या यू-टर्नची राज्यभरात जोरदार चर्चा रंगलीय.