Ahmedabad Plane Crash : अहमदाबादमधील एअर इंडियाच्या विमान अपघाताशी संबंधित एक नवीन व्हिडिओ समोर आला आहे. यामध्ये बी.जे. मेडिकल कॉलेजच्या हॉस्टेलमधील विद्यार्थी आगीपासून स्वतःचा जीव वाचवण्यासाठी बाल्कनीतून उड्या मारताना दिसत आहेत.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
अहमदाबादहून लंडनला जाणारे हे विमान उड्डाण केल्यानंतर काही वेळातच हॉस्पिटलच्या हॉस्टेलला धडकले, ज्यामुळे भीषण आग लागली. त्याचवेळी वसतिगृहात अनेक विद्यार्थी उपस्थित होते. आग पाहून हे विद्यार्थी आपला जीव वाचवण्यासाठी बाल्कनीतून उड्या मारू लागले. या घटनेशी संबंधित व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
मागे आग, पुढे 'विश्वास'
या विमानात असलेल्या 242 पैकी 241 जणांचा मृत्यू झाला. या भयानक विमान अपघातातून केवळ एक प्रवासी विश्वासकुमार रमेश बचावला. सोमवारी या अपघाताचा आणखी एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला होता, ज्यात विमान धडाधडा जळत होते आणि धुराचे मोठे लोट उसळत होते. याच दरम्यान विश्वासकुमार रमेश धुराच्या बाहेर येताना दिसले.
विश्वासकुमारला पाहून तेथे उपस्थित असलेले लोक थक्क झाले. कुणालाही स्वत:च्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता. इतक्या भयानक अपघातातून कुणी कसं वाचू शकतं? असा विचार प्रत्येकाच्या मनात आला. पण, 'देव तारी त्याला कोण मारी' या म्हणीचा प्रत्यय देणारं हे उदाहरण होतं. अपघातानंतर विश्वासकुमारला तात्काळ उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले.
( नक्की वाचा : Ahmedabad Plane Crash: मुलाला वाचवण्यासाठी आगीची पर्वा न करणारी आई, 'हा' Video पाहून अंगावर येईल काटा )