पहलगामचा दहशतवादी हल्ला (Pahalgam Terror Attack), त्यानंतर दहशतवाद्यांची बाजू घेत भारतावर केलेला हल्ला यामुळे पाकिस्तानची अनेक देशांनी निंदा केली आहे. दहशतवादाला प्रोत्साहन देणाऱ्या, खतपाणी घालणाऱ्या पाकिस्तानला काही मुस्लिम देशांनी पाठिंबा दिला आहे. तुर्किए आणि अझरबैजानहे दोन देश त्यात आघाडीवर आहेत. यामुळे या दोन देशांना धडा शिकवण्याचा विडा भारतीयांनी उचलला आहे. यातूनच #BoycottTurkey ट्रेंडला सुरुवात झाली आहे. भारतीय उद्योगजगत असो अथवा मनोरंजन क्षेत्र अनेकांनी या ट्रेंडला पाठिंबा दिला आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
आरपीजी समुगाचे अध्यक्ष हर्ष गोएंका यांनी X वर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, "गेल्या वर्षी भारतीय पर्यटकांमुळे तुर्किए आणि अझरबैजानला 4 हजार कोटी रुपयांहून अधिकचा महसूल मिळाला आहे. भारतीयांमुळे तेथील पर्यटन, नोकऱ्या सगळंच वाढलं असून तिथल्या अर्थव्यवस्थेला मोठा हातभार लागला आहे. आज हे देश पाकिस्तानसोबत उभे आहेत. भारतामध्ये आणि जगामध्ये इतर अनेक सुंदर जागा आहेत.जय हिंद!! "
'अनुपमा' मालिकेतील प्रसिद्ध अभिनेत्री रुपाली गांगुली हिने देखील #BoycottTurkey ला पाठिंबा दिला आहे. गायक विशाल मिश्रानेही रुपाली गांगुलीप्रमाणेच या मागणीला पाठिंबा दिलाय. रुपालीने सोशल मीडियावरील पोस्टद्वारे तुर्किएविरोधात आपली नाराजी व्यक्त केली आहे. भारताचे नागरीक होण्याच्या नात्याने आपण किमान इतके करू शकतो असे तिने म्हटले आहे. तिने म्हटलंय की "प्लीज, आपण तुर्किएची बुकींग रद्द करू शकत नाही का ? माझी सगळ्या भारतीय नागरीक, सेलिब्रिटी, इन्फ्लुएन्सर्स आणि प्रवाशांना विनंती आहे की त्यांनी त्यांची तिकिटे रद्द करावीत. भारतीय होण्याच्या नात्याने आपण किमान इतके करूच शकतो. "
( नक्की वाचा : Video : 'पराभवानंतरही ढोल वाजवण्याची पाकिस्तानची जुनी खोड, POK रिकामं करा', भारतानं ठणकावलं )
कलाकार आणि उद्योगपतींप्रमाणेच सर्वसामान्य नागरिकांनीही या दोन देशांवर आपापल्या पद्धतीने बहिष्कार घालण्याचे आवाहन केले आहे. आम्ही ना सफरचंद खाऊ ना तिथे फिरायला जाऊ अशा प्रतिक्रिया अनेकजण सोशल मीडियावर देताना दिसत आहेत. अभिनेता कुशाल टंडन याच्या आईनेही तुर्किएची ट्रीप रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याने म्हटलंय की माझी आई आणि तिच्या मैत्रिणी पुढच्या महिन्यात तुर्किएला जाणार होत्या. मात्र आता त्यांनी ही ट्रीप रद्द केली आहे. त्यांना हॉटेल आणि विमान कंपनीकडून कोणताही रिफंड मिळालेला नाही.