गेल्या काही दिवसांपासून, 500 रुपयांच्या चलनी नोटा 2026 पर्यंत बंद होतील असा दावा करणारा एक यूट्यूब व्हिडिओ चर्चेत आहे. ज्यामुळे लोकांमध्ये संभ्रम आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तुम्ही देखील हा व्हिडिओ पाहिला असेल आणि काळजीत आहात तर त्यामागील सत्य आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
काय आहे Video?
'कॅपिटल टीव्ही' नावाच्या एका यूट्यूब चॅनेलने 2 जून रोजी पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये म्हटले आहे की, 500 रुपयांच्या नोटा पुढील वर्षी मार्चपासून टप्प्याटप्प्याने बंद केल्या जातील. सुमारे 12 मिनिटांच्या या व्हिडिओला पाच लाखांहून जास्त व्ह्यूज मिळाले आहेत.
केंद्र सरकारने हा दावा 'खोटा' असल्याचे सांगून रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) अशी कोणतीही घोषणा केली नसल्याचे स्पष्ट केले आहे.
( नक्की वाचा : काळ आला होता पण... वेगानं वाहणाऱ्या गंगा नदीमध्ये बुडणाऱ्या तरुणाला देवदूतानं वाचवलं! पाहा Video)
प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो (PIB) फॅक्ट चेक डिव्हिजन या भारत सरकारची अधिकृत तथ्य-तपासणी संस्थेनं X (पूर्वीचे ट्विटर) वर एक पोस्ट करत लिहिले आहे की, '500 रुपयांच्या नोटा बंद केलेल्या नाहीत आणि त्या कायदेशीर चलन म्हणून सुरू राहतील.' त्यांनी नागरिकांना चुकीच्या माहितीला बळी न पडण्याचा सल्लाही दिला आहे.
"कोणत्याही बातमीवर विश्वास ठेवण्यापूर्वी किंवा ती शेअर करण्यापूर्वी नेहमी अधिकृत स्रोतांकडून पडताळून पहा," असेही त्यात म्हंटले आहे.
सध्याच्या 500 रुपयांच्या चलनी नोटा 2016 च्या नोटाबंदीनंतर जारी करण्यात आल्या आहेत. या नोटेचा आकार 66 मिमी x 150 मिमी आहे. नोटांचा रंग स्टोन ग्रे असून, 'भारतीय वारसा स्थळ - लाल किल्ला' ही संकल्पना त्यावर आहे. इतर भारतीय रुपयांच्या नोटांप्रमाणेच, 500 रुपयांच्या नोटांवर त्यांची रक्कम १७ भाषांमध्ये लिहिलेली आहे. इंग्रजी, हिंदी, आसामी, बंगाली, गुजराती, कन्नड, काश्मिरी, कोकणी, मल्याळम, मराठी, नेपाळी, ओडिया, पंजाबी, संस्कृत, तमिळ, तेलुगू आणि उर्दू या भाषांचा त्यावर समावेश आहे.
( नक्की वाचा : RBI च्या निर्णयामुळे घर खरेदी करणाऱ्यांना दिलासा! Home Loan चा EMI कमी होणार, वाचा दर महिना किती होणार बचत? )
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 8 नोव्हेंबर 2016 रोजी देशातील भ्रष्टाचार रोखण्यासाठी आणि बनावट नोटांच्या समस्येवर उपाय म्हणून मागील 500 रुपयांच्या नोटा रद्द केल्या होत्या. दोन दिवसांनंतर नवीन नोटा बदलण्यात आल्या. नोटाबंदीच्या काळात आरबीआयने नवीन 2000 रुपयांची चलनी नोट देखील जारी केली होती. पण, मे 2023 मध्ये या नोटा चलनातून काढून टाकण्यात आल्या आहेत. पण त्या कायदेशीर चलन म्हणून कायम राहिल्या आहेत.