फ्रेंच राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल माक्राँ (Emmanuel Macron) यांचा आणखी एक व्हिडिओ व्हायरल झाला आणि सध्या त्यांच्यावर तोंड लपवण्याचीच वेळ आली आहे. हा व्हिडिओ त्यांचा आणि त्यांची पत्नी फ्रान्सच्या फर्स्ट लेडी ब्रिगीट ( Brigitte) यांचा आहे. नवरा बायकोमधील एक क्षण अचानक जगभरातल्या कॅमेऱ्यांमध्ये क्लिक झाला आणि त्यानंतर फ्रेंच राष्ट्राध्यक्षांना सारवासारव करताना पुरती दमछाक झाली आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
काय आहे प्रकरण?
फ्रेंच राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल माक्राँ यांचा व्हिएतनाम दौरा हा सध्या त्यांच्या वैयक्तिक कारणांमुळे चांगलाच चर्चेत आहे त्याचं झालं असं सोमवारी माक्राँ यांना घेऊन त्यांचं विमान व्हिएतनामला पोहोचलं. विमानतळावर उभ्या विमानाचा दरवाजा उघडला गेला आणि त्यानंतर सर्व कॅमेऱ्यांनी जे टिपलं ते काहीसं विचित्रच होतं. एक हात माक्राँ यांचा चेहरा चक्क धुडकावताना दिसला, तो हात होता फ्रान्सच्या फर्स्ट लेडी आणि माक्राँ यांच्या पत्नी ब्रिगीट यांचा...
प्रथमदर्शनी माक्राँ यांना त्या चक्क कानाखाली लगावत आहेत की काय असंच वाटलं. हा व्हिडिओ क्षणार्धात व्हायरलही झाला. आणि त्यावर जगभरातून टीका-टिपण्णी, मिश्किल कमेंटसचा पाऊस पडू लागला. या घटनेनं माक्राँ दाम्पत्याचं चांगलंच हसंही झालं. व्हिडिओ व्हायरल होताच फ्रेंच राष्ट्रपती कार्यालयानं या व्हिडिओला खोडसाळपणा म्हटलंय.
तर, हे रशियाचं षडयंत्र असल्याची टीकाही फ्रेंच राजकीय वर्तुळातून झाली. मात्र आता यावर खुद्द माक्राँ यांनी स्पष्टीकरण दिलंय. आमची थट्टा मस्करी सुरू होती असं माक्राँ यांनी म्हटलंय. त्यांच्या कार्यालयानंही यावर आता वेगळं स्पष्टीकरण दिलंय.
काय दिलं स्पष्टीकरण?
दौरा सुरू होण्यापूर्वी अध्यक्ष आणि त्यांच्या पत्नीमधील हा एक विरंगुळ्याचा क्षण होता. सर्व कॅमेऱ्यांना सामोरं जाण्यापूर्वी दोघांमध्ये थट्टामस्करी सुरू होती. मात्र कट रचणाऱ्यांना यातून नको तो दारुगोळा मिळाला, अशी सारवासारव फ्रेंच राष्ट्रपती कार्यालयानं केलीय.
फ्रान्सच्या अध्यक्षांची लव्हस्टोरी
ब्रिजीट माक्राँ या पूर्वाश्रमीच्या ब्रिजीट अझुरे आहेत. त्या इमॅन्युएल माक्राँ यांच्यापेक्षा 23 वर्षांनी मोठ्या आहेत.इमॅन्युएल शाळेत असताना ब्रिजीट त्यांच्या शिक्षिका होत्या. त्यांचं लग्न झालेलं होतं. त्यांना पहिल्या लग्नापासून तीन मुलंही आहेत. इमॅन्यूएल माक्राँ आणि ब्रिजीट यांची भेट हायस्कूलमध्ये एका ड्रामा क्लबमध्ये झाली. तिथं ब्रिजीट पर्यवेक्षिका आणि शिक्षिका होत्या वयाच्या 16व्या वर्षी इमॅन्यूएल यांनी ब्रिजीट यांना लग्नाची मागणी घातली होती त्यावेळी ब्रिजीट 39 वर्षांच्या होत्या 2007 मध्ये माक्राँ यांनी वयाच्या 29 व्या वर्षी ब्रिजिट यांच्याशी विवाह केला. त्यावेळी ब्रिजीट 54 वर्षांच्या होत्या.
( नक्की वाचा : Muhammad Yunus : भारताला आव्हान द्यायला निघालेलं युनूस सरकार कोंडीत! बांगलादेशमध्ये पुन्हा सत्तांतर? )
माक्राँ यांच्याशी विवाहापूर्वी त्यांनी पहिल्या पतीकडून घटस्फोट घेतला त्यांच्या विवाहाला माक्राँ कुटुंबीयांचा विरोध होता 2017 मध्ये इमॅन्युएल हे फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष झाल तर ब्रिजीट फर्स्ट लेडी झाल्या.
यापूर्वीही माक्राँ चर्चेत
सध्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर माक्राँ दाम्पत्यावर मिश्किल टिपण्णीही होऊ लागली.दरम्यान याआधीही माक्राँ यांचा टिश्यू पेपर लपवतानाचा व्हिडिओ व्हायरल करून ते कोकेन लपवत असल्याचा दावा करण्यात आला होता. त्यावरही फ्रेंच सरकारनं स्पष्टीकरण दिलं होतं.
( नक्की वाचा : 15 दिवसांची बायको ! 'या' मुस्लीम देशात धडाधड होत आहेत लग्न! वाचा काय आहे भानगड? )
15 मे पूर्वी तुर्कियेमध्ये रशिया युक्रेन वाटाघाटींसाठी जाताना इमॅन्युएल माक्राँ यांची ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टार्मर आणि जर्मनीचे चॅन्सेलर मर्झ यांच्याशी भेट ट्रेनमध्येच भेट झाली होती. यावेळी माक्राँ टेबलवरील टिश्यू पेपर लपवताना दिसले. त्यावरूनही त्यांच्या विरोधकांनी ते कोकेनची नशा करत होते असा प्रचार केला होता.
त्यावेळीही फ्रेंच राष्ट्रपती कार्यालयानं हा दावा खोडून काढला होता. तर अल्बानियामध्ये युरोपीय नेत्यांच्या शिखर परिषदेत तुर्कीचे अध्यक्ष एर्दोगन यांनी माक्राँ यांचं बोट धरून दाबलं हा फोटो ही बराच व्हायरल झाला होता त्यावरून माक्राँ यांच्याविरोधात चर्चाही झाली होती.