Surat News: माणसाने दाखवलेली माणुसकी अन् परोपकाराची भावना मृत्यूनंतरही त्या व्यक्तीची खरी ओळख म्हणून कायम राहते. सुरतमधील एका कुटुंबाने घेतलेल्या निर्णयाने तीन लोकांना नवं आयुष्य दिलं आहे. डॉक्टरांनी ७६ वर्षीय मनुभाई लालजीभाई डोबरिया यांना ब्रेन डेड (मेंदू मृत) घोषित केले, परंतु त्यांच्या कुटुंबाने अवयवदान करण्याचा घेतलेला निर्णय हा माणुसकीचा एक असा आदर्श ठरला आहे, ज्याची सर्वत्र प्रशंसा होत आहे.
अवयवदानाचा ग्रेट निर्णय, तिघांना दिलं जीवदान
समोर आलेल्या माहितीनुसार, सुरतमधील एल.एच. रोडवरील कुबेर नगर सोसायटीत राहणारे ७६ वर्षीय सेवानिवृत्त मनुभाई लालजीभाई डोबरिया ३१ जुलैच्या सकाळी घरात अचानक कोसळले. त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांना तात्काळ १०८ रुग्णवाहिकेने कापोद्रा येथील एका खाजगी रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी त्यांच्यावर सतत उपचार केले, परंतु नंतर त्यांना ब्रेन डेड घोषित केले.
मनुभाईंच्या ब्रेन डेड झाल्याच्या बातमीने संपूर्ण कुटुंबाला मोठा धक्का बसला. दरम्यान, जीवनदीप अवयवदान फाउंडेशन आणि श्री सौराष्ट्र पटेल सेवा समाजाच्या प्रतिनिधींनी कुटुंबाची भेट घेऊन अवयवदानाचे महत्त्व समजावून सांगितले. दुःखाच्या या क्षणी, त्यांची पत्नी लाभुबेन, त्यांचे दोन मुलगे आणि तीन मुलींनी एक असा निर्णय घेतला, ज्यामुळे त्यांचे दुःख मानवतेच्या सेवेच्या महान संदेशात रूपांतरित झाले.
कुटुंबाच्या संमतीने, सुरतच्या किरण रुग्णालयात मनुभाईंच्या एका हाताचे यशस्वी प्रत्यारोपण करण्यात आले. हा हात साबरकांठा येथील १९ वर्षीय तरुणाला देण्यात आला, ज्याने काही वर्षांपूर्वी विजेच्या धक्क्याच्या अपघातात आपला हात गमावला होता. मनुभाईंचे दोन्ही डोळेही दान करण्यात आले, ज्यामुळे दोन अंध व्यक्तींच्या आयुष्यात प्रकाश येईल.
आरोग्यमंत्र्यानी केलं कौतुक
याप्रसंगी गुजरातचे आरोग्य मंत्री प्रफुल्ल पानशेरिया यांनीही रुग्णालयाला भेट दिली. त्यांनी दाता कुटुंबाची भेट घेतली आणि श्रद्धांजली वाहताना म्हणाले की, आपल्या प्रिय व्यक्तीला गमावण्याच्या असह्य दुःखात घेतलेला हा निर्णय समाजासाठी प्रेरणादायी आहे. अवयवदानापेक्षा मोठे दान दुसरे नाही आणि अशी कुटुंबे माणुसकीचे महान उदाहरण आहेत. जीवनदीप अवयवदान फाउंडेशन आणि श्री सौराष्ट्र पटेल सेवा समाज यांच्या संयुक्त प्रयत्नांतून झालेले हे ३३ वे यशस्वी अवयवदान होते.
ब्रेन डेड झाल्यास अवयवदान करण्याची प्रतिज्ञा घेऊन कोणाचा तरी जीव वाचवण्याचे माध्यम बनण्याचे आवाहन या संस्थांनी लोकांना केले होते. मनुभाई डोबरिया आता या जगात नाहीत, पण त्यांचा निर्णय आणि त्यांच्या कुटुंबीयांचे धैर्य तीन जीवनांना नवी आशा देऊन कायम जिवंत राहील. हीच माणुसकी आहे. मृत्यूनंतरही मनुभाईंनी अनेक लोकांना जीवनदान दिले.
Saving Tips VIDEO: पैशाची होणार बचतच बचत! 80/20 चा खास फॉर्म्युला... दिल्लीतील तरुणीची भन्नाट आयडिया