Bus Driver Saves Biker : रस्त्यावर वाहनांची वर्दळ नेहमीसारखीच सुरू होती. एक तरुण आपल्या दुचाकीवरून वेगाने जात होता आणि अचानक काहीतरी असं घडलं की तिथे उपस्थित असलेल्या प्रत्येकाच्या काळजाचा ठोका चुकला. मृत्यू अगदी काही इंचांच्या अंतरावर उभा होता. समोरून येणारी अवाढव्य बस आणि रस्त्यावर पडलेला तो तरुण, हे दृश्य पाहून कोणालाही वाटलं असतं की आता सर्व संपलं. पण नियतीला काहीतरी वेगळंच मान्य होतं. काळ आला होता पण वेळ आली नव्हती, याचा प्रत्यय देणारी ही थरारक घटना नेमकी कुठे घडली आणि त्या क्षणी काय झालं, हे वाचून तुमच्या अंगावरही काटा येईल.
हे थरारक दृश्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालं असून सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा अपघात केरळ राज्यातील मलप्पुरम जिल्ह्यात रविवारी घडला. या घटनेचा व्हिडिओ पाहून बस ड्रायव्हरच्या समयसूचकतेचे सर्वत्र कौतुक होत आहे. जर त्या ड्रायव्हरने सेकंदाचाही विलंब केला असता, तर एका कुटुंबाचा आधार कायमचा हिरावला गेला असता.
नेमकं काय घडलं?
मलप्पुरम जिल्ह्यातील एका गजबजलेल्या रस्त्यावरून एक विद्यार्थी आपली दुचाकी घेऊन जात होता. अचानक त्याचा दुचाकीवरील ताबा सुटला आणि तो थेट रस्त्याच्या मधोमध फेकला गेला. तो खाली पडला त्याच क्षणी मागून एक भरधाव बस येत होती. विद्यार्थ्याचं डोकं आणि बसचं चाक यामध्ये केवळ काही इंचांचंच अंतर उरलं होतं. उपस्थित असलेल्या लोकांसाठी हा क्षण अत्यंत भयावह होता.
( नक्की वाचा : Ajit Pawar Death: अजित पवारांच्या विमानात सुसाईड बॉम्ब? 50 कोटींचा विमा आणि... आजवरचा सर्वात मोठा आरोप )
ड्रायव्हरच्या एका निर्णयाने वाचला जीव
तो विद्यार्थी रस्त्यावर पडला, तसा मागून येणाऱ्या बसच्या ड्रायव्हरने प्रसंगावधान राखलं. समोर संकट दिसताच ड्रायव्हरने क्षणाचाही विचार न करता जोरात ब्रेक दाबले. बस अगदी त्या विद्यार्थ्याच्या डोक्याजवळ येऊन थांबली. बस थांबली नसती तर त्या विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू झाला असता. ड्रायव्हरच्या या चपळाईमुळे विद्यार्थ्याला जीवदान मिळालं आहे.
स्थानिक नागरिक मदतीसाठी धावले
अपघात होताच आजूबाजूला असलेल्या लोकांनी तातडीने त्या विद्यार्थ्याच्या दिशेने धाव घेतली. त्याला रस्त्यावरून बाजूला करण्यात आले आणि सुरक्षित ठिकाणी नेण्यात आले. सुदैवाने, या भीषण प्रसंगातून तो विद्यार्थी केवळ किरकोळ जखमांवर वाचला आहे. त्याला तातडीने वैद्यकीय उपचार देण्यात आले असून त्याची प्रकृती आता स्थिर आहे. या घटनेत इतर कोणालाही दुखापत झालेली नाही.
( नक्की वाचा : VIDEO: 'तुम घाटी लोग...' मुंबईतील बड्या बिल्डरला 'ते' शब्द भोवले; संतापलेल्या कार्यकर्त्यांचा ऑफिसमध्ये राडा )
रस्ते सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर
हा अपघात नेमका कशामुळे झाला आणि विद्यार्थ्याचे दुचाकीवरील नियंत्रण का सुटले, याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र, अशा घटनांमुळे दुचाकीस्वारांच्या सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. गजबजलेल्या रस्त्यांवरून वाहन चालवताना सुरक्षित अंतर राखणे, वेगावर मर्यादा ठेवणे आणि सतर्क राहणे किती महत्त्वाचे आहे, हे या घटनेतून स्पष्ट होते. प्रशासनाने देखील वाहनधारकांना अधिक खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे.
इथे पाहा VIDEO