सामान्य व्यक्तींना सरकारी ऑफिसमधील काम पूर्ण करण्यासाठी किती मनस्ताप सहन करावा लागतो, हे सर्वांनाच माहिती आहे. प्रत्येक सरकार आणि सरकारी विभाग सामान्यांच्या मदतीसाठी सैदव तत्पर असल्याचा दावा करतं. त्यासाठी मोठ्या जाहिराती केल्या जातात. त्यानंतरही बऱ्याच सरकारी कार्यालयातील परिस्थिती बदललेली नाही. 'नोएडा ऑथॉरेटी ऑफ इंडिया' विभागातील कर्मचाऱ्यांना एका वृद्ध व्यक्तीकडं दुर्लक्ष करणं आयुष्यभर लक्षात राहणार आहे. या दुर्लक्षाबद्दल त्यांच्या त्यांच्या बॉसनी दिलेल्या शिक्षेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 2005 च्या बॅचचे आएएस अधिकारी लोकेश एम. या विभागाचे प्रमुख आहेत. त्यांनी या ऑफिसमधील किमान 16 कर्मचाऱ्यांना ही शिक्षा सुनावली.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
काय घडला प्रकार?
नोएडा ऑथॉरेटीच्या ओखलामधील कार्यालयात दररोज शेकडो व्यक्ती वेगवेगळ्या कामासाठी येतात. लोकेश यांनी गेल्या वर्षी या विभागाचा कार्यभार स्विकारला आहे. त्यांनी कार्यभार स्विकारल्यानंतर सामान्य व्यक्की विशेषत: ज्येष्ठ नागरिकाला ताटकळत ठेवू नये असे आदेश त्यांनी दिले आहेत. या कार्यालयात तब्बल 65 सीसीटीव्ही कॅमेरे आहेत. कार्यालयातील कामकाज योग्य पद्धतीनं होत आहे का? हे तपासण्यासाठी लोकेश नियमितपणे हे सीसीटीव्ही फुटेज पाहात असतात.
सोमवारी, एक ज्येष्ठ नागरिक काऊंटरवर उभा असल्याचं लोकेश यांनी पाहिलं. त्यांनी तात्काळ काऊंटरवरील महिला अधिकाऱ्यांना त्यांना ताटकळत ठेवू नका, अशी सूचना दिली. त्यांचं काम होणार नसेल तर तशी स्पष्ट कल्पना संबंधित व्यक्तीला द्यावी, असंही लोकेश यांनी त्या महिला अधिकाऱ्याला सांगितले होते.
( नक्की वाचा : फक्त 20 रुपयात टक्कल दूर करण्याचा उपाय! इतकी गर्दी की रस्ते झाले जाम, पाहा Video )
ही सूचना दिल्यानंतर 20 मिनिटांनीही ती ज्येष्ठ नागरिक त्यांच्या कामासाठी त्याच काऊंटरसमोर ताटकळ उभी होती, हे लोकेश यांना आढळले. हे पाहताच लोकेश यांनी तातडीनं त्या विभागाला भेट दिली. ज्येष्ठ नागरिकांना 20 मिनिटे ताटकळत ठेवल्याबद्दल त्यांनी त्या विभागातील कर्मचाऱ्यांना शिक्षा म्हणून 20 मिनिटं उभं राहण्याची शिक्षा दिली.
सीईओंनी शिक्षा सुनावल्यानंतर सर्व कर्मचारी कार्यालयात उभं असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यावर युझर्स वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत.